‘नाटू नाटू’ गाण्याचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक; म्हणाले, “हे गाणं…”

नवी दिल्ली | Oscar Award 2023 – नुकतीच 95 व्या ऑस्कर पुरस्काराची (Oscar Award) घोषणा झाली आहे. विशेष म्हणजे यंदाचा ऑस्कर पुरस्कार भारतासाठी फारच खास होता. कारण ऑस्कर 2023 साठी आरआरआर (RRR) चित्रपटातील ‘नाटू नाटू’ (Naatu Naatu) गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग कॅटेगरीत नामांकन मिळालं होतं. तसंच हा पुरस्कार आता आरआरआरनं आपल्या नावावर केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या गाण्याची चांगलीच चर्चा सुरू आहे.
या गाण्याचं आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कौतुक केलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “अपवादात्मक… ‘नाटू नाटू’ गाण्याची लोकप्रियता संपूर्ण जगभरात पसरली आहे. हे गाणं पुढील कित्येक वर्षं लोकांच्या स्मरणात राहील. एमएम किरावानी आणि चंद्रबोस या दोघांचे मनःपूर्वक अभिनंदन. हा सन्मान मिळवण्यासाठी संपूर्ण टीमचे अभिनंदन. हा भारतासाठी अभिमानाचा क्षण आहे.”
दरम्यान, गायक एमएम किरावानी (M M Keeravaani) आणि चंद्रबोस (Chandrabose) यांनी मंचावर जाऊन ऑस्कर पुरस्कार स्वीकारला. हा पुरस्कार स्वीकारताना किरावानी म्हणाले, “मी कारपेंटर्सची गाणी ऐकत मोठा झालो आहे. आणि आज माझ्या हातात ऑस्कर पुरस्कार आहे”. तसंच सध्या बॉलिवूडमधील सेलिब्रिटी आणि नेटकरी सोशल मीडियावर या चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा देताना दिसत आहेत.