नौदलाच्या गणवेशावर आता शिवरायांची राजमुद्रा, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
सिंधुदुर्ग | PM Narendra Modi : नौदल दिनानिमित्त (Indian Navy Day) सिंधुदुर्ग (Sindhudurg) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचं आयोजन तारकर्ली येथे करण्यात आलं आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदींनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. यावेळी मोदी म्हणाले की, आज भारतानं गुलामीची मानसिकता मागे टाकली आहे. ती खरी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे. गेल्या वर्षी नौसेनेच्या ध्वजाला विचारांशी जोडता आलं, हे माझं भाग्य आहे. त्यामुळे आता नौदलाच्या गणवेशावर शिवरायांची राजमुद्रा असेल, अशी घोषणा मोदींनी केली.
तर दुसरी घोषणा करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आता नौदलाच्या पदांना भारतीय पद्धतीची नावं देणार आहेत. तसंच पुढे मोदी म्हणाले, प्रत्येक देशासाठी समुद्री सामर्थ्य किती महत्त्वाचं आहे हे छत्रपती शिवाजी महाराज ओळखून होते. त्यामुळे त्यांनी शक्तिशाली नौसेना बनवली होती. तर आज त्यांचे सगळे मावळे आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत.
सशस्त्र दलांमध्ये नारीशक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसंच मी नौसेनेचं अभिनंदन करतो, कारण नेव्हलशीपमध्ये त्यांनी देशातल्या पहिला महिला कमांडर ऑफिसरची नियुक्ती केली आहे.