आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रियदर्शन सहस्रबुद्धेची दखल

ओल्या कचऱ्यातून रोजगार आणि इंधन निर्मिती

पुणे : ओला कचर्‍याने आपली सोसायटी, परिसर इतकेच काय, पण आपले संपूर्ण शहर विद्रूप होते. मात्र, याच ओल्या कचर्‍यातून तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला, त्यातून इंधन मिळाले तर, कचर्‍याची समस्या सुटेलच, पण या समस्येकडे संधी म्हणून पाहाता येईल, असा विश्वास पुण्यातील प्रियदर्शन सहस्रबुद्धे यांनी ‘वायू’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून दाखवून दिले आहे.
त्यांच्या या प्रकल्पाची दखल नॅशनल जिओग्राफिक चॅनेलवरील ’वन फॉर चेंज’ मालिकेत घेतली. त्यांच्या या कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी गेल्या वर्षी त्यांनी अमेरिकेतील ग्रीन स्कील्स चॅलेंज ही स्पर्धा जिंकली होती तेव्हा त्यांना २० हजार डॉलर इतका निधी मिळाला होता.

प्रियदर्शन यांनी ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (आयआयटी) मुंबई येथून अभियांत्रिकी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. पर्यावरण संवर्धन ही आधुनिक समाजापुढील ज्वलंत समस्या आहे. यातून मार्ग काढून शाश्वत विकासाचे नवे प्रारूप निर्माण करणे ही काळाची गरज आहे. त्याच ध्यासातून सहस्रबुद्धे यांनी ‘वायू’ प्रकल्प हाती घेतला.

बायोगॅस हे तंत्रज्ञान आपल्याला गेल्या अनेक वर्षांपासून माहिती आहे. हा विषय अतिशय ताकदीचा असला तरी तो प्रत्यक्षात उतरत नव्हता. ही ताकद घराघरात पोचण्यासाठी त्यात अनेक सुधारणा करून ‘वायू’ हे बायोगॅसवर आधारित उपकरण प्रियदर्शन यांनी विकसित केले आहे. यात शहराला स्वच्छ ठेवणार्‍या सफाई कर्मचार्‍यांची भूमिका सर्वांत महत्त्वाची आहे. कारण, या प्रकल्पातून कचरावेचकांना रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत.

वायू या प्रकल्पात घरातील ओला कचरा जिरवून मिथेन वायूची निर्मिती केली जाते. या वायूच्या वापराद्वारे घरात अन्न शिजवता येते. सद्यस्थितीत वायूमुळे दिवसाला २.५ टन इतका ओला कचरा जिरवून तब्बल ३००० सिलिंडर इतका गॅस वाचविणे यामुळे शक्य होत आहे. तसेच कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन रोखण्यासाठी देखील हे उपकरण उपकारक ठरते.
हरित अर्थव्यवस्थेला हातभार लावणार्‍या प्रियदर्शन यांच्या ‘वायू’ प्रकल्पाला २०२१ साली अमेरिकेतील अशोका चेंजमेकर्स आणि एचएसबीसी बँक यांच्या ’ग्रीन स्कील इनोव्हेशन चॅलेंज’ स्पर्धेत तब्बल २० हजार डॉलर्सचे पारितोषिक मिळाले होते. त्यानंतर सातत्याने त्यांच्या कार्याची दखल विविध माध्यमांमधून घेतली जात होती. नुकतेच त्यांच्या कार्याची दखल घेत नॅशनल जिओग्राफिक वाहिनीने त्यांच्या ‘वन फॉर चेंज’ या पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणार्‍या व्यक्तींवर आधारित मालिकेत प्रियदर्शन यांच्यावर एक स्वतंत्र भाग प्रदर्शित केला आहे.

प्रियदर्शन यांच्या या कार्यावर आधारित एक भाग नॅशनल जिओग्राफिक वाहिनीवरील ‘वन फॉर चेंज’ या मालिकेत दाखविण्यात आला आहे. या मालिकेत २० ‘चेंज मेकर्स’ची निवड करून त्यांचे काम जगासमोर मांडले आहे. लोकसहभाग व हरित रोजगार निर्मिती हे या कामाचे वेगळेपण असून, त्याची दखल यात घेतली गेली आहे.

याबाबत प्रियदर्शन सहस्रबुद्धे म्हणाले, आपल्याकडील ओला कचर्‍याची समस्या सोडविण्यासाठी, त्यापासून ऊर्जानिर्मिती करता यावी यासाठी तसेच कचरावेचकांच्या रोजगाराचे स्वरूप बदलण्यासाठी ‘वायू’ हा प्रकल्प अत्यंत उपयुक्त ठरत आहे. आज जागतिक स्तरावर या प्रकल्पाची दखल घेतली जात असल्याचा मला आनंद होत आहे. पण अजूनही अधिकाधिक नागरिक, व्यावसायिक आस्थापना, कँटीन, हॉटेल, तसेच सोसायटी या कचरा जिरवण्यात स्वयंभू व्हाव्यात, असे मला वाटते. त्यासाठी स्थानिक पातळीवर व्यापक स्वरूपात या प्रकल्पाची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. नागरिकांनी, शासन तसेच लोकप्रतिनिधी यांनी यासाठी समुचित पुढाकार घेतल्यास नक्कीच मोठा बदल घडू शकेल.’’


Sumitra nalawade: