बँक ऑफ महाराष्ट्राच्या दोन सरव्यवस्थापाकांची कार्यकारी संचालक म्हणून पदोन्नती
पुणे : दिनांक ९ ऑक्टोबर २०२३ रोजी देशाच्या सार्वजनिक बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रचे दोन सरव्यवस्थापक श्री संजय रुद्रा व श्री विजयकुमार निवृत्ती कांबळे यांची अन्य राष्ट्रीयकृत बँकांमध्ये कार्यकारी संचालक म्हणून पदोन्नती झाली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रसाठी ही एक महत्वपूर्ण उपलब्धी असून बँकेच्या नेतृत्वाने केलेल्या सातत्यपूर्ण उत्तम कामगिरीची ही पावती आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या दोन सरव्यवस्थापकांना बँकिंग समुदायातील महत्वाच्या बँकांच्या नेतृत्वाची संधी प्राप्त होणे ही बँक ऑफ महाराष्ट्रच्या इतिहासात एक दैदिप्यमान व महत्वपूर्ण घटना म्हणून नोंद करावी लागेल.
भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाच्या दिनांक ९ ऑक्टोबर २०२३ रोजी जारी झालेल्या अधिसूचनेनुसार बँक ऑफ महाराष्ट्रचे सरव्यवस्थापक श्री संजय रुद्रा यांची युनियन बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक म्हणून व श्री विजयकुमार निवृत्ती कांबळे यांची युको बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, हे सर्वांना कळविण्यास बँक ऑफ महाराष्ट्राला अतिशय आनंद होत आहे.
सदर पदोन्नती हे बँक ऑफ महाराष्ट्राच्या नेतृत्वाच्या कामगिरीचे एक सकारात्मक प्रतिबिंब आहे. गुणवत्तेला वाव देऊन बँकिंग व्यवसायाच्या वृद्धीसाठी बँकेची असलेली कटीबद्धता यातून दिसून येते. नवीन भूमिकेत कार्यरत होऊन उत्तम कामगिरी बजावण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र आपल्या पदोन्नती झालेल्या या दोन्ही अधिकाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा देत आहे.