वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ चंद्रकांत पाटलांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादीकडून आंदोलन

पुणे : (Chandrakant Patil News Pune) 1 मे 1960 साली महाराष्ट्र राज्य स्थापन झाले. या महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर एकूण 63 वर्षात वेगवेगळ्या विचारांची वेगवेगळ्या पक्षांची सरकारे या महाराष्ट्रात स्थापन झाली. परंतु इतक्या वर्षांमध्ये कुठल्याही राजकीय पक्षाने अथवा नेत्याने जे चुकीचे धाडस केले नाही ते धाडस राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे नेते व मंत्री करत आहेत. भारतीय जनता पार्टीचे नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ते धाडस करत महाराष्ट्राच्या महापुरुषांचा अवमान केला आहे. महाराष्ट्राची ओळख ही छत्रपती शिवरायांचा, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा महाराष्ट्र म्हणून जगभरात आहे. त्या महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भीक मागून शाळा चालवल्या, अशा प्रकारचे अवमानजनक वक्तव्य पुण्याचे वाचाळवीर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. अशा प्रकारचे चुकीचे वक्तव्य करत चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांचा अवमान केला आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने चंद्रकांत पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर हे आंदोलन केले.

यावेळी “चंद्रकांत पाटील मुर्दाबाद”, “चंद्रकांत पाटील हाय हाय”, “चंद्रकांत पाटील यांचे करायचे काय..? खाली डोकं वर पाय”, “वाचाळविर भाजपचा धिक्कार असो”, अशा प्रकारच्या घोषणांनी संपूर्ण परिसरात दणाणून सोडला होता.
यावेळी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की , छत्रपती शिवराय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले या महापुरुषांचा आवमान केल्याने भारतीय जनता पार्टीने चंद्रकांत पाटील यांची तात्काळ मंत्री मंडळातून हकलपट्टी करावी आणि त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच भारतीय जनता पार्टीने संपूर्ण राज्याची माफी मागावी अशी मागणी प्रशांत जगताप यांनी यावेळी केली. तसेच इथून पुढे कुठल्याही राष्ट्रपुरुषांचा अवमान सहन केला जाणार नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या विरोधात आणखी तीव्र स्वरूपाच्या आंदोलन करेल असा इशारा देखील देण्यात आला.

प्रसंगी प्रशांत जगताप, प्रदीप देशमुख, बंडू केमसे, दिपालीताई धुमाळ, लक्ष्मीताई दुधाने, हर्षवर्धन मानकर,किशोर कांबळे, दीपक जगताप, सुषमा सातपुते गिरीश गुरनानी, मिलिंद गिरीश गुरुनानी, ऋषिकेश कडू, निलेश शिंदे, नवनाथ खिल्लारे , आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.