‘गांधी गोडसे एक युद्ध’च्या स्क्रीनिंग दरम्यान मुंबईत काळे झेंडे दाखवत प्रेक्षकांनी निषेध नोंदवला
मुंबई | राजकुमार संतोषी दिग्दर्शित ‘गांधी गोडसे एक युद्ध’ (Gandhi Godse Ek Yudh) हा 26 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी अनेक स्तरातून विरोध होत आहे. नुकतंच मुंबईमध्ये (Mumbai) या चित्रपटच्या स्क्रीनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्क्रीनिंग दरम्यान काही लोकांनी काळे झेंडे दाखवत निषेध नोंदवला. या चित्रपटाचा निषेध करणाऱ्यांचा असा आरोप आहे की, या चित्रपटामध्ये गांधींना कमी लेखण्यात आलं आहे. तसेच, त्यांचा मारेकरी नथुराम गोडसे यांचा गौरव करण्यात आला आहे.
या स्क्रीनिंगवेळी दिग्दर्शक राजकुमार संतोषी हे देखील हजर होते. अंधेरी परिसरातील एका चित्रपटगृहात चित्रपटाचे काही फुटेज आणि संवाद दाखवण्यात आले होते. त्या दरम्यान काही लोकांनी या चित्रपटाचा निषेध केला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली.
‘गांधी गोडसे एक युद्ध’ या चित्रपटाचा टीझर 2 जानेवारी रोजी रिलीज झाला होता. त्यानंतर या चित्रपटाचा ट्रेलर देखील रिलीज करण्यात आला. या चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) याने प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटामधून राजकुमार संतोषी यांची मुलगी तनीषा संतोषीनं देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटात महात्म गांधी यांची भूमिका दीपक अंतानी यांनी साकारली आहे.