पुण्यात बटाट्याचा पाला खाल्ल्याने 20 गायींचा मृत्यू; 40 जनावरांची प्रकृती चिंताजनक
पुणे | बटाट्याचा पाला खाल्ल्याने गायींना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील निरगुडसरमधून समोर आला आहे. यामध्ये गीर जातीच्या 20 गायींचा मृत्यू झाला असून 40 हून अधिक गायींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत राजस्थानी व्यावसायिकांचे 16 ते 17 लाखांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आंबेगाव निरगुडसर मेंगडेवाडी हद्दीवरील रस्त्यावर राजस्थान येथून आलेले लालगाई वाले गेल्या अनेक वर्षापासून वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडे जवळपास 150 गाई, वासरे आहेत. ते आपला उदरनिर्वाह करण्यासाठी लाल गाई पाळतात. दुग्ध व्यवसाय व शेणखत विक्रिकरुन ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात. तसेच निरगुडसर व आजूबाजूच्या परिसरातील फ्लावरचा पाला, बटाट्याचा पाला, कांद्याची पाथ व शेतकऱ्यांच्या शेतात सोडून दिलेला भाजीपाला, तरकारी ते त्यांचे गायांना खाण्यासाठी घेऊन येत असतात.
निरगुडसर गावातीलदूध व्यावसायिक हिरा खोडा भरवाड, काना वामा भरवाड, देवकन गंगाजी भरवाड यांच्या मालकीच्या या गाई आहेत. बटाट्यावरील रासायनिक फवारणीआणि रोगराईमुळे गायींना विषबाधा झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेत पंचनामे केले आहेत.व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाल्यामुळे नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली जात आहे.
निरगुडसर गावाच्या शेजारी असणाऱ्या थोरांदळे गावात बटाटा पिकाची काढणी सुरू होती. या शेतातील कापून ठेवलेला बटाटयाचा पाला गायींना खाण्यासाठी आणला होता. हा पाला खाल्ल्यानंतर गाईंना विषबाधा झाली. ज्यामध्ये 16 गाई आणि 4 कालवडी अशा एकूण 20 गायी मृत्युमुखी पडल्या आहेत. तसेच 40 गाईंची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.