पुण्यात प्रवाशांचा गोंधळ; तब्बल १० तास विमानाला उशीर

पुणे : पुणे विमानतळावर (Pune AirPort) विमान प्रवाशांना तब्बल १० तास विमानाची वाट बघत ताटकळत बसावे लागले आहे. बंगळुरूला जाणारे एअर एशियाचे (AirAsia) विमान सकाळी साडेपाच वाजता असल्यामुळे प्रवासी पहाटे तीन वाजल्यापासून पुणे विमानतळावर आले होते. पण दुपारी तीन वाजेपर्यंत विमानच आले नसल्याने प्रवाशांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला. विमानतळावरच प्रवाशांनी विमान कंपनीचा निषेध केला. (Pune Airport AirAsia)
साडेपाच वाजता येणाऱ्या विमानासाठी तीन वाजल्यापासून विमानतळावर येऊन बसलेले प्रवाशी सकाळी एक दोन तास वाट बघत बसले. त्यांनतर प्रवाशांनी विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला. कर्मचाऱ्यांनी विमानात काही बिघाड झाली असल्याचे उत्तर दिले. विमान वेळेवर न पोहोचल्याने अनेकांच्या कामाचा खोळंबा झाला. एका महिलेने आपले वडील आजारी असून ते मरणाशी झुंज देत असताना मला लवकर बंगळुरूला पोहोचणे गरजेचे असल्याचे म्हणत रडायला सुरुवात केली. प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ बघायला मिळाला. त्यांनतर तब्बल १० तासांनी दुपारी तीन वाजताचे जयपूरला जाणारे विमान बंगळुरूच्या प्रवाशांना देण्यात आले. त्यामुळे जयपूरला जाणाऱ्या प्रवाशांनाही काही तास मनस्ताप सहन करावा लागला.
प्रवाशांनी यावेळी एअर एशियाच्या नावाने जोरदार घोषणाबाजी केली. जयपूरचे विमान बंगळुरूला पाठविल्यामुळे जयपूरचे प्रवासी रखडले. त्यांनतर जयपूरच्या प्रवाशांनी भुवनेश्वरला जाणारे विमान जयपूरला सोडण्याची मागणी केली. मात्र जयपूरला साडेपाच शिवाय विमानच नसल्याचे विमान कंपनीने ऐनवेळी सांगितले. त्यामुळे जयपूरला जाणाऱ्या प्रवाशांनीही विमानतळावर घोषणाबाजी सुरु केली.