अल्पवयीन मुलांना गाडी चालवायला देता? पालकांनो सावधान, होईल मोठी शिक्षा
पुणे | शहरात अल्पवयीन मुलांना दुचाकी किंवा चार चाकी चालवताना आपण अनेकदा पाहतो. आपल्यातील अनेकांची मुलं देखील कमी वयातच गाडी चालवायचा लागतात. मात्र पालकांनो आता सावध व्हा. कारण या संदर्भात आता कठोर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. अल्पवयीन ड्रायव्हर्समुळे होणारे रस्ते अपघात आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार आता अल्पवयीन ड्रायव्हर्सच्या पालकांना कठोर दंड तसेच तीन वर्षांची शिक्षा होणार आहे.
पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, धूलिवंदन सणानिमित्त २५ मार्च रोजी तुकाई नगर सर्कल सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती. या वेळी दोन अल्पवयीन मुले दुचाकी चालविताना आढळून आली. त्यांच्याकडे विचारपूस केली असता, दोघांकडे वाहन चालविण्याचा परवाना नव्हता.
या प्रकरणी पोलिस कर्मचारी श्रावण शेवाळे यांनी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून पालकांविरुध्द मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम ३, ५, १९९ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या गुन्ह्यात दोन्ही दुचाकी जप्त केल्या आहेत.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सहआयुक्त प्रवीण पवार, अतिरिक्त आयुक्त प्रवीणकुमार पाटील, पोलिस उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक पोलिस आयुक्त भीमराव टेळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुरेश जायभाय, पोलिस कर्मचारी दीपक गबदुले यांनी ही कारवाई केली.
पालकांवर कारवाई
पालकांनी आणि वाहनांच्या मालकांनी अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यासाठी देऊ नये. वाहन जप्त करून संबंधितांविरुद्ध पुढील कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.
विनापरवाना वाहन चालविणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या पालकांना मोटर वाहन कायद्यानुसार तीन वर्षे शिक्षा आणि २५ हजार रुपये दंडाची तरतूद आहे. अशा अल्पवयीन मुलांना वयाच्या २५ वर्षांपर्यंत वाहन परवाना मंजूर करू नये. तसेच, जप्त केलेल्या वाहनांचा परवाना एक वर्षासाठी रद्द करावा, असे पत्र प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिले आहे.
संभाजी कदम, पोलिस उपायुक्त, परिमंडळ तीन.