धक्कादायक! मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी सराफी पेढी लूटण्याचा कट
पुणे | Pune News : पुण्यात (Pune) एक धक्कादायक घटना घडली आहे. मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी काही तरूणांनी चक्क सराफी पेढी लूटण्याचा कट रचला होता. मात्र, आरोपी तरूणांचा हा कट भारती विद्यापीठ (Bharati Vidyapeeth) पोलिसांनी उधळून लावला. याप्रकरणी पोलिसांनी सर्व आरोपी तरूणांना अटक केली आहे.
दिवाळी असल्यामुळे संपूर्ण पुणे शहरात खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. तसंच भारती विद्यापीठातील त्रिमूर्ती चौकात देखील खरेदीसाठी लोकांची मोठी गर्दी होती. तर या ठिकाणी सराफी पेढी लूटण्यासाठी काही चोरट्यांची टोळी येणार असल्याची माहिती पोलिसांना आधीच मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी सापळा रचत आरोपींना पकडले. आरोपी तरूणांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून पाच काडतुसे, दोन पिस्तूल आणि तीन दुचाकी असा चार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी रचला कट
आरोपींच्या एका मित्राचा खून सिंहगड परिसरात झाला होता. मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आरोपींनी पैशांची जुळवाजुळव सुरू केली होती. त्यामुळे आरोपींनी सराफी पेढी लूटण्याचा कट रचला होता. तसंच पैशांची चोरी केल्यानंतर ते पैसे पुढे जामिन व इतर न्यायालयाच्या खर्चासाठी तरतुद म्हणून ते वापरणार होते.
तर आरोपींचा हा कट उधळून लावण्यामध्ये भारती विद्यापीठ पोलिसांना यश आलं आहे. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, उपनिरीक्षक धीरज गुप्ता, सहायक निरीक्षक अमोल रसाळ, मंगेश पवार, राहुल तांबे, चेतन गोरे, अभिजीत जाधव, निलेश ढमढेरे आदींनी ही कामगिरी केली आहे.