ऑनलाइन वेश्याव्यवसायाचा रचला डाव; दोन तरुणींसह दलालांवर पोलिसांनी घातला घाव..
पुणे : (Pune Crime News) विमाननगर भागात सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी दलालांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, परराज्यातील दोन तरुणींना ताब्यात घेतले. आरोपी दलाल ऑनलाइन पद्धतीने वेश्याव्यवसाय चालवित असल्याचे उघडकीस आले आहे.
दीपक शरयू यादव (वय २८, रा. चंदननगर, मूळ रा. झारखंड), रवी अशी गुन्हा दाखल केलेल्या दलालांची नावे आहे. याबाबत सामाजिक सुरक्षा विभागातील हवालदार तुषार भिवरकर यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दीपक आणि साथीदार रवि ऑनलाइन पद्धतीने वेश्याव्यवसाय चालवित होते.
समाजमाध्यमात तरुणींचे छायाचित्रे प्रसारित करायचे. सर्व व्यवहार ऑनलाइन पद्धतीने सुरू होते. पैसे दिल्यानंतर तरुणीने विमाननगर भागातील हॉटेलमध्ये बोलावून घेतले जायचे. याबाबतची माहिती सामाजिक सुरक्षा विभागातील तुषार भिवरकर आणि अमेय रसाळ यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने विमाननगर भागात छापा टाकून कारवाई केली.
पोलिसांनी हरयाना, तसेच उत्तर प्रदेशातील दोन तरुणींना ताब्यात घेतले असून, त्यांची निरीक्षणगृहात रवानगी करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, सागर केकाण, संदीप कोळगे, बाबा कर्पे, राजेंद्र कुमावत, रेश्मा कंक आदींनी ही कारवाई केली.