आंदोलन संपत नाही, तोपर्यंत दिवाळी साजरी करायची नाही; नीरा ग्रामपंचायतचा मोठा निर्णय
पुणे | मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आळंदी-पंढरपूर महामार्ग मराठा बांधवांनी नीरा (ता. पुरंदर) येथे गुरुवारी (दि. 2) अडवून धरला. सकाळी 10 वाजत सुरू झालेले रस्ता रोको आंदोलन दुपारी बारा वाजता मागे घेण्यात आले. यानंतर पुणे-पंढरपुर मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. तर दिवसभर नीरा आणि परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला.
नायब तहसीलदार महादेव जाधव यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, निरीक्षक बापूसाहेब सांडभोर, सहायक निरीक्षक मनोज नवासरे यांनी बंदोबस्त ठेवला होता. नीरा आणि परिसरातील मराठा बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी इतर समाजातील बांधवांनी देखील मराठा बांधवांना पाठिंबा दिला.
नीरा ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर महिलांच्या हस्ते सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आंदोलन सुरू करण्यात आले. या आंदोलनात इतर जाती धर्मातील लोक देखील सहभागी झाले होते. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण दिले जात नाही, तोपर्यंत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा ठराव यावेळी मांडण्यात आला, तर मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन संपत नाही, तोपर्यंत दिवाळी साजरी करायची नाही, असा ठरावही मांडण्यात आला.
केंद्र सरकार आपले ऐकत नसले तर सर्व आमदारांनी राजीनामा द्यावा. म्हणजे केंद्र सरकार जागे होईल. राज्यातील सर्व आमदार खासदारांसाठीकडे ओबीसी दाखले आहेत. ते त्याचा फायदा घेतात. सर्वसामान्य मराठा समाज मात्र हाल सोसत आहे. त्याला, त्यांच्या मुलाला दुय्यम वागणूक दिली जात आहे. त्यामुळे सरकार देणार नसेल तर आमदार, खासदारांना गावात येवू देऊ नका, असे आवाहनही करण्यात आले.