ड्रग माफिया ललित पाटीलची गर्लफ्रेंड प्रज्ञा कांबळे मानसिक रुग्ण; जामिनासाठी वकिलांची कोर्टात धाव
पुणे | ड्रग्ज माफिया ललित पाटील याची मैत्रीण ॲड. प्रज्ञा कांबळे मनोरुग्ण असल्याच्या दावा तिच्या वकिलांनी न्यायालयात केला आहे. प्रज्ञावर मानसिक उपचार सुरु असून तिला जामीन द्यावा, यासाठी शिवाजीनगर कोर्टात अर्ज करण्यात आलेला आहे.
पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या ललित पाटील याने 2 ऑक्टोबर रोजी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन रुग्णालयातून पळ काढला होता. पळून गेल्यानंतर ललित पाटील हा ॲड. प्रज्ञा कांबळे हिच्या सतत संपर्कात होता, असं पोलिसांच्या तपासात स्पष्ट झालं आहे.
प्रज्ञा कांबळे सध्या कुठे आहे?
सध्या प्रज्ञा कांबळे ही पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे. तिच्या कोठडीची मुदत आज, मंगळवारी संपणार आहे. प्रज्ञा कांबळे हिच्या वकिलांनी पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात जामीन अर्ज सादर केला आहे. या अर्जात एक नवी बाब पुढे आली आहे. ॲड. प्रज्ञा कांबळे ही मनोरुग्ण असून पासून ती मानसिक उपचार घेत असल्याचं पत्र तिच्या वकिलाने कोर्टासमोर सादर केलं आहे. शिवाय जामीन अर्जासोबत वैद्यकीय प्रमाणपत्र जोडण्यात आलं असल्याची सूत्रांची माहिती आहे.
आरोपी ॲड. प्रज्ञा कांबळेचे मानसिक संतुलन ठिक नसेल तर ती ललित पाटीलला पळून जाण्यास कशी काय मदत करू शकते, असा युक्तीवाद तिच्या वकिलांकडून कोर्टात केला जाऊ शकतो.