अग्निशमन दलाकडून आगीमध्ये अडकलेल्या 9 वर्षाच्या मुलीची सुखरुप सुटका
पुणे | Pune News – काल मध्यरात्री बाराच्या सुमारास कात्रज, भारती विद्यापीठ समोर, नॅन्सी लेक होम या इमारतीत आग (Fire) लागल्याची घटना घडली होती. तर या घटनेची माहिती अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मिळताच दलाकडून अग्निशमन मुख्यालय, अग्निशमनवाहन व एक रेस्क्यु व्हॅन, कात्रज, गंगाधाम, कोंढवा बुद्रुक येथून एकुण 4 वाहने रवाना करण्यात आली होती.
घटनास्थळी पोहोचताच सदर ठिकाणी 11 मजली इमारतीत दुसऱ्या मजल्यावर 1560 स्क्वे.फुट सदनिकेत मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे पाहताच जवानांनी चारही बाजूने पाण्याचा मारा सुरू केला. त्याचवेळी घरामधे कोणी अडकले आहे का याची खात्री करीत असताना एक लहान मुलगी (कु. राजलक्ष्मी दिलिप सुकरे – वय वर्ष 9) खिडकीमधील लोखंडी ग्रिलमधे अडकल्याने वाचवण्याकरिता आरडाओरडा करीत होती. त्याचवेळी जवानांनी तातडीने मुलीला वाचवण्याचे प्रयत्न सुरू केले.
दोन बी ए सेट तसेच हायड्रोलिक कटर, कटावणी, रश्शीचा वापर करत खिडकीजवळ शिडी लावून काही जवानांनी शेजारील सदनिकेच्या गच्चीवरुन मुलीच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले. अवघ्या पाच ते दहा मिनिटात जवानांच्या प्रयत्नाला यश येऊन आगीमधे अडकलेल्या मुलीची सुखरुप सुटका करण्यात आली. तसेच सदरील आग वीस मिनिटात नियंत्रणात आली. घराचे मोठे नुकसान झाले असून आग इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज आहे. या घटनेत कोणीही जखमी झाले नसून कोणतीही जिवातहानी झालेली नाहीये.
या कामगिरीत दलाचे अधिकारी प्रदिप खेडेकर, वाहन चालक येरफुले, अतुल मोहीते, तांडेल मंगेश मिळवणे व जवान रामदास शिंदे, तेजस मांडवकर, चंद्रकांत गावडे, सुधीर नवले, लक्ष्मण घवाळी, दिगंबर बांदिवडेकर, तेजस खरीवले, अर्जुन यादव, अभिजित थळकर यांनी सहभाग घेतला.