क्राईमताज्या बातम्यापुणे

पुण्यात विमानाने येऊन चोरी करणारी राजस्थानमधील टोळी गजाआड

पुणे | थेट विमानाने येऊन शहरातील मोठ्या मॉलमधून महागडे ब्रॅंडेड कपडे आणि बूट चोरणाऱ्या आरोपींना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून ब्रँडेड कंपनीच्या पॅंट, टी-शर्ट असा सुमारे सव्वाचार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गौरवकुमार रामकेश मीना (वय १९), बलराम हरभजन मीना (वय २९), टोळीप्रमुख योगेशकुमार लक्ष्मी मीना (वय २५) आणि सोनुकुमार बिहारीलाल मीना (वय २५) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी संगमवाडी येथील आरटीओ कार्यालयासमोरील एका मॉलमधून आरोपींनी कपडे घेतले. त्यानंतर ते दुकानातून पळून जात होते, परंतु सुरक्षारक्षकांनी पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले. मॉलनजीक असलेल्या त्यांच्या मोटारीची झडती घेतली असता मोटारीत ब्रॅन्डेड कंपनीचे कपडे, बूट आणि बेल्ट आढळून आले. पोलिसांनी आरोपीकडे चौकशी करून टोळीप्रमुख योगेश मीनाला खडकी बाजार येथील हॉटेलमधून ताब्यात घेतले, तर सोनू मीनाला पुणे रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले.

तपासादरम्यान बंडगार्डन पोलिस ठाण्यात दाखल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक आयुक्त संजय सुर्वे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान पवार, पोलिस निरीक्षक (गुन्हे) श्रीकांत निंबाळकर यांच्या सूचनेनुसार सहाय्यक निरीक्षक अभिजित जाधव, पोलिस उपनिरीक्षक रवींद्र गावडे, पोलिस कर्मचारी ज्ञानेश्वर बडे, शिवाजी सरक, मनोज भोकरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कपडे ट्रायल करण्याच्या बहाण्याने चोरी

आरोपी जयपूर ते मुंबई विमानाने प्रवास करून मुंबईत येत होते. मुंबईतून झूम कार अॅपद्वारे मोटार भाडेतत्त्वावर घेऊन पुण्यात येत असत. त्यानंतर मॉलमधून ब्रॅन्डेड कपडे आणि बूट चोरी करीत असत. कपडे ट्रायल करण्याच्या बहाण्याने कपड्यांवरील सिक्युरिटी आणि बारकोड टॅग तोडून एकावर एक कपडे घालून ते चोरी करत होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये