पती-पत्नीमध्ये हॉटेलच्या मालकीवरून वाद; वैशाली हॉटेलचे प्रकरण थेट पोलिसांत
पुणे | पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल वैशाली 72 वर्षांपासून एफसीरोडवर दिमाखात उभे आहे. या हॉटेलमधील पदार्थांचा स्वाद घेण्यासाठी पुण्यातूनच नाही तर जवळपासच्या भागातूनही लोक येत असतात. गेल्या काही दिवसांपासून हे हॉटेल चर्चेचा विषय ठरले आहे. या हॉटेलमधील मालकीवरुन वाद रंगला आहे. हा वाद दोन पार्टनरमध्ये नाही तर पती आणि पत्नीमध्ये आहे. आता हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेला आहे.
नेमकं प्रकरण काय?
वैशाली हॉटेल हे निकिता शेट्टी यांच्या मालकीचे आहे. त्यांनी पती विश्वजीत विनायक जाधव यांच्यावर फसवणुकीचे आरोप केले आहेत. पती आणि इतरांकडून हे हॉटेल बळकवण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विश्वजीत जाधव यांनी आपली खोटी सही करुन फ्लॅट तारण ठेवला. त्यानुसार पाच कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचा आरोप निकिता शेट्टी यांनी दिलेल्या तक्रारात केला आहे. त्यानंतर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैशाली हॉटेलच्या मालक असलेल्या निकिता शेट्टी यांनी दिलेल्या तक्रारीत पती विश्वजीत विनायक जाधव यांच्यासह इतर काही जणांची नावे आहेत. त्यात कोटक महिंद्रा बँकेच्या येरवडा शाखेचे व्यवस्थापक राजेश देवचंद्र चौधरी, डीएसए आर. आर. फायनान्सचे रवी परदेशी यांचा समावेश आहे. यामुळे पोलिसांनी या सर्वांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच हॉटेल वैशालीची मालकीही विश्वजीत जाधव यांनी आपल्याला नशा देऊन काढल्याचा आरोप निकीता शेट्टी यांनी केला आहे