वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे वाहतूक शाखेचा मोठा निर्णय; ‘या’ भागात जड वाहनांना मनाई
पुणे | येरवडा, मुंढवा, कोरेगाव पार्क भागात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे वाहतूक शाखेने मोठा निर्णय घेतला आहे. या भागातील रस्ते सकाळी व सायंकाळी अवजड वाहनांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक शाखेने घेतला आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. (Pune Traffic Updates News)
नगर रस्त्यावरून शास्त्रीनगर चौक आणि रामवाडी चौक येथून आगाखान पूलमार्गे कोरेगाव पार्क, तसेच मुंढव्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर दररोज सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत जड वाहनांना मनाई करण्यात आली आहे. कोरेगाव पार्क परिसरातून साऊथ मेन रस्ता, नॉर्थ मेन रस्ता, बर्निंग घाट रस्त्यावरुन एबीसी फार्म हाऊस चौकमार्गे कल्याणीनगर आणि मुंढव्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर जड वाहनांना मनाई करण्यात आली आहे. मुंढव्यातील ताडीगुत्ता चौकातून कोरेगाव पार्क येणाऱ्या रस्त्यावर जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे, असे मगर कळविले आहे.