पुणे

पुणे मेट्रो प्रवाशांसाठी खुषखबर! स्थानकांमध्ये प्रवेश करणे आता होणार अधिक सोयीस्कर

पुणे शहरातील सुविधा वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून शहरात महामेट्रोची सुरुवात करण्यात आली. एकेकाळी वाहतुकीसाठी पुणेकरांना फक्त पीएमपीएमएल बसचा पर्याय होता. आता मात्र पुण्यात मेट्रो आली आहे. मेट्रोचा विस्तारही केंद्र सरकारकडून केला जात आहे. अल्पवधीतच या मेट्रोला पुणेकरांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. आता पुण्यातील मेट्रो प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुणे मेट्रोने प्रवाशांना स्थानकात सहजपणे प्रवेश करता यावा यासाठी पाच स्थानकांनी नवीन प्रवेशद्वारे खुली केली आहेत.

मेट्रोच्या पाच स्थानकांसाठी आणखी प्रत्येकी एक नवीन प्रवेश तसेच बाहेर पडण्याचे द्वार सुरू केले आहे. यामध्ये पीएमसी, छत्रपती संभाजी महाराज उद्यान, डेक्कन जिमखाना, बोपोडी आणि कल्याणीनगर मेट्रो स्टेशनचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी एकच प्रवेशद्वार असल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती. तसेच प्रवाशांना काही ठिकाणी वळसा मारून स्थानकांपर्यत पोहचावे लागत होते. मात्र, या प्रवेशद्वारामुळे ही गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे. या पाचही ठिकाणी महामेट्रोकडून एकच बाजूने प्रवेश तसेच बाहेर पडण्याचा मार्ग होता. त्यामुळे या स्थानकांवर प्रवाशांना पोहचताना तसेच बाहेर पडताना वर्दळीच्या रस्त्यांवरून जीव मुठीत घेऊन स्थानक गाठावे लागत होते.

त्यामुळे आता प्रवाशांना डेक्कन चौकात येण्याची गरज नाही. महापालिका स्थानकावर प्रवाशांना मेट्रोतून उतरून थेट पादचारी पूलावरून शिवाजी पुलावर जाता येणार आहे. तसेच शिवाजी पुलावरूनच थेट स्टेशनमध्ये येता येणार आहे. तर डेक्कन जिमखाना स्थानकात जाण्यासाठी प्रयाग हॉस्पिटलच्या बाजूला जंगली महाराज रस्त्यावर प्रवेशद्वार असणार असल्याने प्रवाशांना डेक्कन चौकात येण्याची गरज असणार नाही. तसेच छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्टेशन स्थानकात जाण्यासाठी आता बालगंधर्व चौकात न जाता छत्रपती संभाजी महाराज उद्यानाच्या प्रवेशद्वाराच्या पलिकडे आणखी एक प्रवेशद्वार असणार आहे.

प्रवाशांना जागतिक दर्जाची मेट्रो सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. स्थानकांची सुरू करण्यात आलेली नवीन प्रवेशद्वारेही याचाच भाग आहेत. यामुळे प्रवाशांना अतिशय सहजपणे आणि कमी कालावधीत मेट्रो स्थानकात पोहोचण्यास मदत होईल, असे मत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये