आरोग्यताज्या बातम्यापुणे

आतड्याला पीळ पडलेल्या चिमुरड्याला जीवदान! मिडगट व्हॉल्वुलस विकारावर पुण्यात यशस्वी उपचार

पुणे | एका चार वर्षांच्या मुलाला मिडगट व्हॉल्वुलस हा विकार होता. त्यामुळे त्याची तब्येत खूपच खालावली होती. कमजोर स्नायू, फुगलेले ओटीपोट आणि अतिसार याने तो त्रस्त होता. पुण्यातील खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी या मुलावर शस्त्रक्रिया करून त्याला बरे करण्यात यश मिळविले आहे.

मिडगट व्हॉल्वुलसने त्रस्त या मुलाला सुरुवातीला वाराणसीतील एका रुग्णालयात नेण्यात आले. त्याठिकाणी त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. परंतु, त्यानंतरही त्याच्या तब्येतीत सुधारणा झाली नाही. या अवस्थेत तीन महिने काढल्यानंतर या मुलाला पुण्यातील सूर्या मदर अँड चाइल्ड हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. डॉ. सचिन शहा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मुलाला बारकाईने तपासले. त्याच्यावर पुन्हा शस्त्रक्रिया आवश्यक असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतरच्या चार तासांच्या शस्त्रक्रियेमध्ये डॉक्टरांना मुलाच्या ओटीपोटात चिकटपणा आढळून आला. त्याचे आतडे एकत्र चिकटले होते आणि आतड्याच्या कार्यात अडथळा निर्माण झाला होता.

शस्त्रक्रियेनंतर मुलाच्या तब्येतीत सुधारणा होत गेली. त्याला १० दिवसांनंतर रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. पुढील तीन महिने त्याच्या तब्येतीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले. तीन महिन्यांच्या कालावधीनंतर त्याचे वजन योग्य पद्धतीने वाढू लागल्यावर डॉक्टरांनी समाधान व्यक्त केले.

मिडगट व्हॉल्वुलस म्हणजे काय?

मिडगट व्हॉल्वुलस हा गंभीर विकार नवजात बालके आणि मुलांमध्ये आढळून येतो. जन्मल्यानंतर पहिल्या काही आठवड्यातच, आतड्यांमधील जन्मजात विसंगतीमुळे ही स्थिती निर्माण होते. यामध्ये आतडे अचानक वळते आणि वरच्या ओटीपोटात ताण निर्माण होतो. पित्ताच्या उलट्या होणे आणि ओटीपोट नाजूक होणे ही याची प्राथमिक लक्षणे आहेत. हा विकार उपचार करून बरा करता येतो. परंतु त्याचे निदान करण्यास उशीर झाला तर रुग्णाची तब्येत वेगाने खालावत जाते आणि जीवावरही बेतण्याची शक्यता असते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये