पुणे

पुणे महानगरपालिका मालामाल; मिळकतकरामधून तब्बल ‘एवढ्या’ कोटींचे उत्पन्न

पुणे महापालिकेला मिळकतकरामधून सुमारे १ हजार ३३१ कोटीचे उत्पन्न मिळाले आहे. यामध्ये सर्वाधिक भरणा ऑनलाईन पद्धतीने झाला आहे. एकुण मिळकतधारकांपैकी ६८ टक्के लोकांनी म्हणजे ४ लाख ९४ हजार ६९४ मिळकतधारकांनी ८०८ कोटी ऑनलाईन जमा केले आहेत.

आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या दोन महिन्यात म्हणजे एप्रिल आणि मे महिन्याच्या अखेरपर्यंत मिळकतकर भरणाऱ्या नागरिकांना मिळकतकराच्या सर्वसाधारण करामध्ये ५ टक्के आणि १० टक्के इतकी सवलत दिली जाते. नागरिकांकडून मुदतवाढ देण्यासाठी सातत्याने मागणी केली जात होती.शहरात १४ लाख २२ हजार मिळकतधारक असून, त्यांना यंदाच्या आर्थिक वर्षांत मिळकतकरांची देयके पाठविण्यात आली आहेत. महापालिकेच्या नियमानुसार संपूर्ण वर्षाचे देयक मे अखेरपर्यंत भरल्यास मिळकतधारकांना मिळकतकरात पाच ते दहा टक्के सवलत दिली जाते.

कर भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर

यंदा मे महिन्याच्या अखेरीस पालिकेच्या मिळकतकर भरण्यासाठीच्या वेबसाइटवरील तांत्रिक अडथळे व अन्य बाबींमुळे सवलतीसह मिळकतकर भरण्यास १५ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत आता संपली आहे. या १७ जून पर्यंत महापालिकेला १ हजार ३३ लाख एवढे उत्पन्न प्राप्त झाले आहे. १७ जून या दिवशी १ कोटी ९३ लाख मिळाले आहेत. यामध्ये सर्वाधिक भरणा हा ऑनलाईन पद्धतीने झाला असून एकूण करदात्यांपैकी ६८ टक्के म्हणजेच ४ लाख ९४ हजार ६९४ मिळकतधारकांनी कर जमा करण्याकरिता ऑनलाईन पद्धतीचा वापर केल्याची माहिती पालिकेच्या मिळकतकर विभागाच्या वतीने देण्यात आली. त्यांनी जमा केलेल्या कराचे प्रमाण आजवर जमा झालेल्या कराच्या ६१ टक्के आहे.

पहिल्या दोन महिन्यात कर भरणाऱ्यांंना सूट

पालिकेकडून करवसुलीवर विशेष भर देण्यात आला आहे. त्यानुसार एप्रिल महिन्यापासून म्हणजेच आर्थिक वर्ष सुरू झाल्यापासूनच करवसुली सुरू झाली होती. पहिल्या दोन महिन्यात म्हणजे एप्रिल आणि मे महिन्यात मिळकतकर भरणाऱ्या नागरिकांना ५ ते १० टक्के सूट दिली जाते.

पालिकेच्या एकूण एकूण मिळकतधारक करदात्यांपैकी ७ लाख ३१ हजार ३४२ करदात्यांनी १७ जूनपर्यंत मिळकतकराचा भरणा केला आहे. आणखी ५ लाख मिळकतधारकांनी कर भरलेला नाही. त्यामुळे मिळकतकराचे यंदाचे उत्पन्न २८०० कोटी रुपयांपर्यंत जाण्याची अपेक्षा मिळकतकर विभागाला आहे.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये