प्रदूषणाच्या मुद्द्यावरुन ‘महामेट्रो’ला पुणे महापालिकेचा कडक इशारा
पुणे | शहर सध्या प्रदूषणामुळे (Pune City Pollution) गुदमरले आहे. हवा गुणवत्ता निर्देशांकाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुण्यात सध्या सुरू असलेले गृह प्रकल्पांची बांधकामे, मेट्रोचे बांधकाम, वाहनांचे प्रदूषण, हवामानातील बदल आणि फोटोकेमिकल प्रतिक्रिया यामुळे प्रदूषण हे दिवसेंदिवस वाढतच चाललले आहे. त्यामुळे बांधकाम प्रकल्पांसाठी लागू करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांनुसार ‘महामेट्रो’लाही (Pune Metro) बांधकामांच्या ठिकाणी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना पालिकेने दिल्या आहेत. स्वारगेट येथील मेट्रो हबमधील रेडी मिक्स काँक्रिट अर्थात आरएमसी प्लांटच्या ठिकाणी तीन दिवसांत 25 फूट पत्रे व हिरवी जाळी लावावी, अन्यथा काम थांबविण्याचा इशारा पालिकेतर्फे देण्यात आला आहे.
निर्माणाधीन बांधकाम प्रकल्पांमुळे प्रदूषणात भर पडत असल्याचेही समोर आल्याने पालिकेने विविध प्रतिबंधात्मक नियम लागू केले आहेत. यात बांधकामाच्या चारही बाजूला २५ फूट पत्रे लावणे, साहित्याचे लोडिंग-अनलोडिंग करताना पाणी मारणे, बांधकामाभोवती हिरवी जाळी लावणे आदी उपाययोजनांचा समावेश आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनांनुसार या उपाययोजना तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मेट्रो मार्गिकेसाठी स्वारगेट येथे मेट्रो हब उभारण्यात येत आहे. हे हब अत्यंत वर्दळीच्या जेधे चौकालगत असून, त्यासमोरच एसटी स्थानक व पीएमपी डेपोही आहे. या मेट्रो हबमध्ये भूमिगत मेट्रो स्टेशनसह वर बहुमजली व्यावसायिक इमारत उभारली जाणार आहे. हे काम वेगाने सुरू असून बांधकामासाठी आवश्यक काँक्रिट जागीच उपलब्ध व्हावे, यासाठी येथे रेडी मिक्स काँक्रिट प्लांट (आरएमसी) उभारण्यात आला आहे. हा प्लांट सातत्याने सुरू असतो. बांधकामासाठी आवश्यक साहित्य आणणाऱ्या वाहनांचीही येथे सातत्याने ये-जा सुरू असते. त्यामुळे प्रदूषणात भर पडत असल्याची तक्रार केली जात होती. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी ‘महामेट्रो’च्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.