कोथरूड भागात रात्रीतून डांबरीकरण
कोथरूड | Kothrud News – पौड रस्त्यावरील शिवतीर्थनगर समोरील रस्ता म्हणजे डोंगरमाथ्यावरील रस्ता झाल्याचा भास वाहन चालकांना होऊ लागला आहे. धक्कादायक म्हणजे महिनाभरापूर्वी पावसाची विश्रांती घेतलेली असतानाही या रस्त्याची दुरूस्ती झाली नव्हती. हवामान विभागाने पावसाचा अंदाज दिल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून दुरूस्तीच्या कामाला “उरकण्यात’ आले. पावसात सर्व डांबर वाहून गेले याबाबत दैनिक राष्ट्र संचारमध्ये 7 ऑक्टोबर मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यावर प्रशासन यंत्रणा खडबडून जागी झाली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कोथरूड विधानसभा अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी या विषयी अधिकारी वर्गाशी सातत्याने पाठपुरावा केला होता.
पौड रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने परिसरातील अंतर्गत रस्तेही खड्डेमय झाले आहेत. हे खड्डे जून-जुलैच्या पावसातच पडले होते. त्यानंतर पावसाने दडी मारली आणि तशी महापालिका प्रशासनानेही दडी मारली आणि खड्डे भरलेच नाही. वारंवार मागण्या केल्यावर महिन्याभराने प्रशासनाने खड्डे भरण्याचा निर्णय घेतला आणि कामाला सुरवात झाली देखील मात्र, हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज दिल्यावर प्रशासनाने घाईघाईने डांबरीकरण करून खड्डे भरले गेले. सुरवातीच्या दोन पावसातच डांबर निघाले आणि सर्व खडी रस्त्यावर पसरल्याने नागरिकांना जीवघेणी कसरत करावी लागत असल्याचे भयंकर चित्र होते.
वाहन चालकांना कसरत करत वाहने चालवावी लागत असल्याचे चित्र होते. रविवारी पहाटे प्रशासनाकडून डांबर टाकून खड्डे बुजविण्यात आले.
पहाटेपर्यंत डांबरीकरणाचे हे काम सुरु होते. सदर मागणीची दखल घेतल्याबद्दल गिरीश गुरनानी यांनी अधिकारी वर्गाचे आभार मानले. परंतु याबाबत पुन्हा तक्रार करावी लागू नये यासाठी पथ विभागाने सातत्त्याने देखभाल ठेवावी त्यामुळे वाहन चालक आणि स्थनिक नागरिकांना दिलासा मिळेल, असे गिरीश गुरनानी यांनी राष्ट्र संचार शी बोलताना सांगितले.