कौटुंबिक वाद टोकाला! खडकवासला धरणात तरूणाची आत्महत्या
पुणे | Pune News – पुण्यात (Pune) एक धक्कादायक घटना घडली आहे. कौटुंबिक वाद झाल्यामुळे एका तरूणानं टोकाचं पाऊल उचललं. या तरूणानं खडकवासला धरणात आत्महत्या केली आहे. स्वप्नील रामभाऊ कणसे (वय 34) असं आत्महत्या केलेल्या तरूणाचं नाव आहे. तर या तरूणाच्या आत्महत्येनंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
स्वप्नील कणसे हा तरूण रंगकाम कारायचा. तसंच त्याला दारूचं व्यसन देखील होतं. त्यामुळे त्याचे घरात वाद होत होते. तर असंच एकदा कौटुंबिक वाद झाल्यामुळे स्वप्नील घरातून निघून गेला. तो घरी परत न आल्यामुळे त्याच्या आईनं उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
खडकवासला धरणातील मोरीजवळ एका तरूणाचा मृतदेह तरंगताना पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाहिला होता. त्यामुळे त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसंच पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तरूणाचा मृतदेह बाहेर काढला. त्यावेळी मृतदेह स्वप्नीलचाच असल्याचं समजलं.