पुणे नाईट मॅरेथॉन ४ डिसेंबर रोजी

पुणे : पुणे शहराचे नाव आंतरराष्ट्रीय क्रीडा नकाशावर आणि पुणेकर आतुरतेने वाट पहात असलेली पुणे आंतरराष्ट्रीय नाईट मॅरेथॉन रविवार, दि. ४ डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती मॅरेथॉन ट्रस्टचे ट्रस्टी अॅड. अभय छाजेड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
छाजेड म्हणाले, की यंदाचे हे ३६ वे वर्ष आहे. या स्पर्धेचा प्रारंभ ३ डिसेंबर रोजी रात्री १२ नंतर व (४ डिसेंबर ००:०१ वाजता) होईल. या नाईट मॅरेथॉनमध्ये महिला-पुरुषांचे प्रत्येकी ६ गट आहेत. पुरुष व महिला ४२.१९५ कि.मी.ची पूर्ण मॅरॅथॉन, पुरुष व महिलांच्या साठी अर्ध मॅरॅथॉन (२१.०९७५ किमी) या शिवाय या दोन्ही विभागांसाठी १० कि.मी.,५ कि.मी., व्हीलचेअर (३ किमी) आणि फॅमिली रन ( ३ किमी)असे अन्य गट आहेत.
यंदाच्या मॅरेथॉनचे वैशिष्ठ म्हणजे या वर्षी (सप्टेंबर २०२२) लडाखमध्ये झालेल्या सरहद कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमधील पूर्ण मॅरेथॉनचे पुरुष गटातील विजेते जीग्मेट नामग्याल आणि पूर्ण मॅरेथॉन महिला गटातील विजेती डीक्सेट डोल्मा हे पुण्याच्या नाईट मॅरेथॉनमध्ये प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत.
या स्पर्धेत भाग घेतलेल्या धावपटूंनी नोंदविलेल्या वेळेनुसार त्यांना विशिष्ट गुण (पॉइंटस) देण्यात येतील आणि पुढील वर्षी अमेरिकेतील शिकागो येथे होणाऱ्या वांडा वर्ल्ड मॅरेथॉनमध्ये प्रवेशासाठी या गुणांचा विचार केला जाईल आणि त्याप्रमाणे वरील शिकागो स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्यांना सुलभता प्राप्त होईल. तसा आंतरराष्ट्रीय करार उभयातांमध्ये (पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन आणि वांडा वर्ल्ड चॅम्पियनशिप्स मॅरेथॉन, शिकागो) करण्यात आला आहे. या वेळी जॉइंट रेस डायरेक्टर व ट्रस्टी रोहन मोरे, रेस डायरेक्टर सुमंत वाईकर, जॉइंट टेक्निकल रेस डायरेक्टर वसंत गोखले, जॉइंट रेस डायरेक्टर गुरुबन्स कौर, डॉ. राजेंद्र जगताप उपस्थित होते.