पुणेकरांसाठी आनंदवार्ता! PMPML च्या ताफ्यात लवकराच 400 बस दाखल होणार
पुणे : (Pune PMPML News) ‘पीएमपी’च्या संचालक मंडळाच्या मागे झालेल्या बैठकीत स्वमालकीच्या १०० सीएनजी बस आणि ३०० नवीन बस या भाडेतत्वावर घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे या आठवड्यात टेंडर प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. यात ३०० ‘सीएनजी’वर धावणाऱ्या व १०० इलेक्ट्रिक बसचा समावेश आहे. ‘सीएनजी’ बस दाखल होण्यास किमान तीन महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रिक बसला मात्र उशीर लागणार आहे.
‘सीएनजी’वर भर अधिक
‘पीएमपी’ प्रशासनाने ‘सीएनजी’वर धावणाऱ्या बसची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ‘पीएमपी’च्या स्वमालकीच्या ९८१ बस आहेत, तर सात ठेकेदारांच्या मिळून १०९८ बस आहेत. नव्याने दाखल होणाऱ्या एकूण ४०० बस पैकी ३०० बस ‘सीएनजी’ आहेत, तर १०० इलेक्ट्रिक आहेत. ‘सीएनजी’वर होणारा खर्च हा इलेक्ट्रिक गाड्यांच्या तुलनेत कमी आहे.
दोन लाख प्रवाशांची सोय
‘सीएनजी’च्या एका बसमधून दिवसाला सरासरी ७३० प्रवाशांची वाहतूक होते. ३०० नव्या बस आल्यावर दिवसाला किमान दोन लाख १९ हजार प्रवाशांची वाहतूक होईल. यामुळे प्रवाशांची संख्या वाढेल. शिवाय विविध मार्गावरच्या बसमध्ये प्रवाशांना जागेअभावी उभे राहून प्रवास करावा लागतो. नव्या बसमुळे प्रवाशांची सोय होईल.
पीएमपी स्वमालकीच्या १०० सीएनजी बस घेत आहे. तर ३०० बस ठेकेदारांच्या असणार आहेत. या आठवड्यात टेंडर प्रक्रियेला सुरवात होईल. तीन महिन्यांत ‘सीएनजी’ बस प्रवासी सेवेत दाखल होतील.
नितीन नार्वेकर , सह व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे