पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगारांची धिंड! हजारहून अधिक अट्टल गुन्हेगारांचा समावेश
पुणे | पुण्यात १३ तारखेला लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या साठी गैरप्रकार टाळण्यासाठी पुण्यात पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा कंबर कसली असून गुन्हेगारांची ओळख परेड घेऊन त्यांची धिंड काढण्यात आली. गुरुवारी तब्बल हजार हून अधिक गुंडांना पोलिस ठाण्यात बोलावून त्यांना तंबी देण्यात आली. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या आदेशानुसार गुंडांच्या परेड काढण्यात येत आहे. या पूर्वी अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार पुण्यातील अट्टल गुन्हेगारांची शाळा पुणे पोलिस आयुक्तालयाच्या आवारात भरवण्यात आली होती.
राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे सुरू आहे. पुण्यात १३ तारखेला मतदान पार पडणार आहे. हे मतदान शांततेत आणि निर्विघ्न पार पडण्याची जबाबदारी पोलीसांवर आहे. यामुळे शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरात विविध ठिकाणी चेक नाके देखील उभारण्यात आले आहे. या माध्यमातून पोलिस नजर ठेवून आहेत. दरम्यान, निवडणुकीपूर्वी पोलिसांनी पुन्हा एकदा शहरातील गुंडांची झाडझाडती घेण्यास सुरुवात केली आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार पुण्यातील विविध पोलीस ठाण्यातील गुंडांची हजेरी घेण्यात आली असून त्यांना गैरप्रकार तसेच निवडणूक काळात घातपात केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.