पसार झालेला कैदी पुन्हा कारागृहात हजर; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
पुणे | येरवडा कारागृहातून (Pune Yerwada Jail) पसार झालेला कैदी बुधवारी सकाळी पुन्हा कारागृहात परतला. जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याला वृद्ध आई-वडिलांची काळजी वाटल्याने तो पसार झाल्याचा दावा कारागृह प्रशासनाने केला आहे. बुधवारी सकाळी आई-वडिलांनी त्याला पुन्हा येरवडा कारागृहात हजर केले.
आशिष भारत जाधव (वय 37) असे या कैद्याचे नाव आहे. तुरुंग अधिकारी हेमंत पाटील यांनी कैदी पळून गेल्याची तक्रार येरवडा पोलिस ठाण्यात दिली होती. त्यावरून पोलिसांनी जाधववर गुन्हा दाखल केला होता.
जाधव कुख्यात गुंड असून, त्याच्यावर वारजे पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. न्यायालयाने 26 मे 2014 रोजी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तो 16 ऑगस्ट 2022 पासून खुल्या कारागृहात शिक्षा भोगत आहे. जाधवने सोमवारी दुपारी सुरक्षारक्षकांची नजर चकवून कारागृहातून पलायन केले होते.
जाधवच्या आईला हृदयविकाराचा झटका आला होता. आईला भेटण्यासाठी तो कारागृहातून पळून गेल्याचा प्राथमिक अंदाज कारागृह प्रशासनाने वर्तविला आहे. येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने प्रशासनाने पोलिसांना कैदी माघारी परतल्याची माहिती दिली. पोलिसांनी कारागृहात येऊन जाधवला ताब्यात घेतले.