कुंडात आंघोळीसाठी उतरलेल्या २१ वर्षीय इंजिनिअरचा बुडून मृत्यू; १२०० फूट खोल दरीत सापडला मृतदेह
पुणे | पुण्यातील ताम्हिणी घाटातील प्लस व्हॅली परिसरात मित्रांसोबत फिरण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काल मंगळवारी दुपारी ही घटना घडली आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. रोहन विरेश लोणी (वय २१) असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन आणि त्याचे काही मित्र हे मंगळवारी ताम्हिणी घाटातील प्लस व्हॅली येथे फिरण्यासाठी गेले होते. येथे दुर्गम भागात कुंड आहे. रोहन हा त्याच्या मित्रासह येथील अवघड वाट पार करून या कुंडात पोहण्यासाठी गेले. रोहन व त्याचे मित्र कुंडात पोहण्यासाठी उतरले. दरम्यान, पोहतांना दम लागल्याने रोहन कुंडातील पाण्यात बुडाला. ही बाब त्याच्या मित्रांच्या लक्षात आली. त्यांनी रोहनचा शोध घेण्याचा प्रयत्न मात्र, तो सापडला नाही.
रोहनच्या मित्रांनी पौड पोलिसांशी संपर्क साधत या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येत कुंडात त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, रोहन सापडला नाही. शेवटी पोलिसांनी लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू पथकाला याची माहिती देत त्यांना मदतीसाठी पाचारण केले. पथकातील स्वयंसेवक प्लस व्हॅली परिसरात येत शोध मोहीम सुरू केली.
पथकातील सचिन गायकवाड, महेश मसने, दिव्येश मुनी, अशोक उंबरे, सुनील गायकवाड, सुनील गायकवाड, योगेश उंबरे, प्रिन्स बैठा, सागर कुंभार, योगेश दळवी आदींनी शोधमोहीम राबवली. रात्री ९ वाजता कुंडात बुडालेल्या रोहनचा मृतदेह बाहेर काढला. रात्री साडेनऊच्या सुमारास स्वयंसेवकांनी त्याचा मृतदेह ताम्हिणी घाटातील मुख्य रस्त्यावर आणला.