धक्कादायक! मुंढवा भागात अल्पवयीन कर्णबधिर मुलीवर तिघांकडून बलात्कार
पुणे | पुण्यात गुन्हेगारी सोबतच बलात्काराच्या घटनांमध्ये देखील वाढ होत आहे. अशातच मुंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. आईच्या प्रियकरासह तिघांनी १७ वर्षीय कर्णबधीर मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपींमध्ये मुलीचा जवळचा नातेवाईक आणि मित्र यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील एका विशेष मुलांच्या शाळेतील शिक्षिकेने मुंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २०१९ ते २०२३ या कालावधीत घडला आहे.
नेमकं प्रकरण काय ?
आरोपींपैकी एक जण पीडितेच्या कुटुंबातील आहे, तर एक जण आईचा प्रियकर व एक जण पीडितेचा मित्र आहे. पीडित मुलीची आई दिवसभर धुण्याभांड्यांची कामे करते. तिच्या वडिलांचे पूर्वीच निधन झाले आहे. पीडित मुलगी घरी असताना, आईच्या प्रियकराने घरी येऊन जबरदस्तीने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. पीडितेच्या मित्राने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. पीडिता घरी एकटीच असताना तिच्या कुटुंबातीलच एका अल्पवयीन मुलाने जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
असा झाला प्रकार उघड
पीडित मुलगी शाळेत असताना तिच्या मोबाइलमध्ये वर्गातील मैत्रिणींनी पीडितेचे आणि तिच्या मित्राचे काही फोटो पाहिले. त्यानंतर मैत्रिणींनी शिक्षिकेला त्याची माहिती दिली. शिक्षिकेने अधिक चौकशी केल्यावर संपूर्ण प्रकार उघडकीस आला, अशी माहिती मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी दिली.