पुणे वाहतूककोंडी : शेकडो वाहनचालकांची दमछाक

पुणे : अलीकडच्या काळापासून पुण्याचा झपाट्याने विकास होत चालला आहे. तसेच पुण्यात माहिती-तंत्रज्ञानसेवा पुरवणाऱ्या कंपन्या मोठ्या प्रमाणात आल्यावर शहरात नागरिकांची आणि त्याबरोबरच वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे पुणेकरांना रोजच वाहतूककोंडीस सामोरे जावे लागत आहे. शहरातील मध्यवर्ती पेठांच्या भागातही वाहतूककोंडी रोजचीच आहे. शहरातील उपनगरांत तर वाहतूककोंडी नित्याचीच झाली आहे. शहरातील ‘वाहतूककोंडीचा भस्मासुर’ वाढतच असल्याने त्याचा त्रास चालकांना होत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून ठोस उपाययोजनांची गरज आहे.
शहरामध्ये लोकसंख्येप्रमाणे वाहनाच्या संख्येत भर पडत आहे. त्याचा थेट परिणाम वाहतूककोंडीत होत असल्याचे दिसून येते. वाहतूक पोलिसांच्या कार्यरत मनुष्यबळामुळे पोलीस वाहतूक नियंत्रणाचे काम करीत असतात. सध्या दंडात्मक कारवाईला खो देण्यात आला आहे. फक्त आनलाइन थकित दंड वसूल करण्याचा आदेश आहे. वाहनचालकांनी शिस्त पाळणे, वाहतूक नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे.
— राहुल श्रीरामे, वाहतूक उपायुक्त (पुणे शहर)
स्वारगेटचा भाग कायम वर्दळीचा असतो. जेधे चौकात सकाळपासूनच वाहतूककोंडीला सुरुवात होते, ती रात्री दहापर्यंत कायम असते. येथे वाहतूक पोलीस असतात; पण त्यांचे लक्ष फक्त वाहनचालकाच्या दंडात्मक कारवाईवरच जास्त असते. कधी कधी सिग्नल बंद असतात, त्या वेळेत तर पोलीस दिसूनच येत नाही. परिणामी वाहतूककोंडी होत असते.
— नितीन देसाई, वाहनचालक (भारती विद्यापीठ)
शहरात दिवसेंदिवस वाहतुकीची समस्या वाढत आहे. कर्वे रस्त्यावरील हुतात्मा राजगुरू चौकात नेहमीच वाहतूककोंडी होत असते. मात्र, या चौकात आठवड्यातून एकदाच वाहतूक पोलीस आढळून येतात. या भागात काही वाहनचालक दुचाकीवरून उलटे येत असतात. त्यामुळे घरी परतणाऱ्या नागरिकांना वाहतूककोंडीचा फटका बसल्याचे दिसून आले आहे. नगर रस्त्यावरील येरवडा परिसरातील शास्त्री चौक म्हणजे नेहमीच गजबजलेला चौक. कल्याणीनगर, खराडी, विमानगर वडगाव शेरीकडून येणारी व तिकडे जाणारी, पुणे-मुंबई महामार्गावर जाणारी वाहनेदेखील या चौकातून जातात. या चौकात कायम गर्दी असते. या चौकात वाहतूक पोलीस अभावानेच दृष्टीस पडतात.
सक्षम सार्वजनिक व्यवस्थेची गरज…
शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याने मोठ्या प्रमाणात लोक स्वतःची वाहने वापरतात. ही वाहने रस्त्यावर आल्याने साहजिकच शहराच्या विविध भागात वाहतूककोंडी होते. दुचाकी आणि चारचाकी घेणाऱ्यांचे प्रमाण शहरात वाढले आहे. परिणामी रस्त्यावरील वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. वाहतुकीचे नियोजन वाहनकेंद्रित न करता नागरिककेंद्रित केले पाहिजे. नागरिकांचा विचार नियोजनामध्ये झाला पाहिजे. मात्र तसे होत नाही. वाहनकेंद्रित नियोजन आवश्यक नसल्याचे मत सामाजिक कार्यकर्त्यांनी वाटते.
सिंहगड रस्ता, वर्दळीच्या आणि गजबजलेल्या राजाराम पूल चौकात वाहतूक पोलीस अपवादानेच दिसून येतात. हा चौक कायम वाहतूककोंडीच्या विळख्यात सापडतो. उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने संपूर्ण रस्त्यावर वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. माणिकबाग चौक, आनंदनगर येथील भा. द. खेर चौक, हिंगणे चौक आणि विश्रांतीनगर चौकातही गर्दीच्या वेळेत प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. मुख्य रस्त्यावर वाहतूककोंडी होत असल्यामुळे आता अंतर्गत रस्त्यावरही कोंडी होत आहे. यामुळे नागरिकांना भर पावसात अडकून राहावे लागते. काही चौकांत वाहतूक पोलिसांकडून कोंडी सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण, अनेक ठिकाणी पोलीस उपस्थित नसल्याचे नागरिकांनी ‘राष्ट्रसंचार’च्या प्रतिनिधीला सांगितले.
सायकल ट्रॅक केवळ नावापुरताच…
शहरात ठिकठिकाणी सायकल ट्रॅक तयार करण्यात आले. तसेच पायी चालणाऱ्या लोकांसाठी फूटपाथ तयार करण्यात आले. मात्र हे सायकल ट्रॅक केवळ नावालाच असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. सोबतच फूटपाथही ठिकठिकाणी फेरीवाल्यांनी बळकावल्याचा दिसून येतो. अनेक ठिकाणी फुटपाथवरून दुचाकी गाड्या जात असल्याचे चित्रही पाहायला मिळते. त्यामुळे पायी चालणारे आणि ज्यांना सायकल चालवायची इच्छा आहे, अशांची कोंडी होत आहे, असे मत अभ्यासकांनी व्यक्त केले.
शहरात काही रस्त्यांवर कामे सुरू असल्यामुळे वाहतूककोंडी वाढतच आहे. स्वारगेट येथील जेधे चौकात दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत वाहनांची वर्दळ सुरू असते. गर्दीच्या दिवशी सायंकाळी चौकात केवळ तीनच वाहतूक पोलीस उपस्थित असल्याने फक्त नियमभंग करणाऱ्या दुचाकी चालकांना अडविण्यासाठी तीन वाहतूक पोलीस दबा धरून बसले होते. शिवाजी रस्ता, शंकरशेठ रस्ता यावरील वाहतुकीकडे, नियमनाबाबत त्यांनी डोळ्यांवर पट्टीच बांधली होती. वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाईबरोबरच नियमनाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.