क्राईमताज्या बातम्यापुणे

सेवा विकास सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी रोझरी स्कूलचा संचालक विनय अरहानासह एकला अटक

पुणे | पिंपरी-चिंचवडमधील सेवा विकास सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी रोझरी एज्युकेशन ग्रुपचे संचालक विनय अरहाना आणि ॲड. सागर सूर्यवंशी याला राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) ताब्यात घेतले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) गुरुवारी रात्री छापे टाकले होते, त्यानंतर अरहानला ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर मध्यरात्री (साडे बाराच्या सुमारास) सूर्यवंशी आणि अरहान विशेष न्यायालयात हजर झाले. न्यायालयाने त्यांना सीआयडी कोठडी सुनावली. शिवाजीनगर सत्र न्यायालयाच्या इतिहासात प्रथमच मध्यरात्री सुनावणी झाली.

अरहानाला आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीकडून अटक करण्यात आली होती. सेवा विकास बँकेतील कर्ज गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी सीआयडीच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. अरहानाविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. त्याने मुंबई उच्च न्यायालायात याचिका दाखल करुन गुन्हे रद्द करण्याची मागणी केली होती. उच्च न्यायलयाने गुन्हे रद्द करुन त्याला दिलासा दिला होता. मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालायत सुनावणी झाल्यानंतर सीआयडीला तपासाबाबत परवानगी देण्यात आली होती. सीआयडीच्या पथकाने अरहाना आणि ॲड. सूर्यवंशीची चौकशी करुन त्यांना अटक केली.

सेवा विकास बँकेची मुख्य शाखा पिंपरी येथे आहे. बँकेच्या एकूण २५ शाखांमध्ये एक लाख खातेदार आहेत. २०१० आणि २०२० या कालवधीत सेवा विकास बँकेतील गैव्यवहाराबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. जून २०२१ मध्ये रिझर्व्ह बँकेने गंभीर दखल घेतली. गैरव्यवहार प्रकरणात बँकेच्या संचालकांना अटक करण्यात आली होती. बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. लेखापरीक्षकामार्फत रिझर्व्ह बँकेकडे अहवाल सादर करण्यात आला होता. त्यानुसार पिंपरी पोलिसांनी विशेष तपास पथकाची नियुक्ती केली होती. चौकशीत बँकेत ४२९ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले होते. ईडीने याप्रकरणात बँकेचे अध्यक्ष अमर मूलचंदानी यांच्यासह अन्य आरोपींची चौकशी केली होती. त्यांना याप्रकरणात अटक करण्यात आली होती. विनय अरहाना आजारपणाच्या बहाण्याने येरवडा कारागृहातून ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. तेथे अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलशी त्याची ओळख झाली. ललितला ससूनमधून पसार होण्यासाठी त्याने मदत केल्याचे उघड झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये