पुण्यात हे चाललंय काय! आधी प्रेयसीच्या नाकात गांजाचा धूर सोडला आणि नंतर…
पुणे | सांस्कृतिक शहर असलेल्या पुण्यात महिलांवरील अत्याचाराचे (Pune Crime) प्रमाण वाढत चालले आहे. अशातच उंड्री परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. तरुणीचे हात पाय बांधून तिला गांजाचा धूर देऊन लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. श्रवण राजेंद्र अंकुशे (रा. उंड्री) असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने कोंढवा पोलीस स्टेशन फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपासून श्रवण आणि पीडित तरुणीचे प्रेम संबंध होते. मात्र, आरोपी तरुणाचे आणखी काही मुलींसोबत संबंध असल्याचे पीडित तरुणीला समजले होते. त्यानंतर पीडितेने श्रवणसोबत असलेले प्रेम संबंध तोडले होते. त्यानंतर आरोपी एक दिवस तिच्या घरी आला आणि तिला गांजा पिण्यास सांगितले. मात्र, गांजा पिण्यास तिने नकार दिल्यानंतर त्याला राग आला आणि त्याने पीडित तरुणीला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिचे हात पाय बांधले आणि गांजाचा धूर तिच्या नाकात सोडला. त्यानंतर तिला ग्लानी आल्यावर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ज्यावेळी तिची गुंगी उतरली त्यावेळी आपल्यावर अत्याचार झाल्याचे तिच्या लक्षात आले. त्यानंतर तिने कोंढवा पोलीस स्टेशन गाठले आणि आरोपी विरोधात फिर्याद दिली. या प्रकरणाचा अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.