मैत्रिणीला मॉडेलिंगसाठी नेल्याने तरुणावर केला प्राणघातक हल्ला; पुण्यातील धक्कादायक घटना
पुणे | शिक्षणाचं माहेरघर, सांस्कृतिक शहर, स्मार्ट सीटी आणि आता कॉस्मोपॉलीटियन सीटी या नावानं ओळखलं जाणारं पुणे मागील काही वर्षांपासून गुन्हेगारीच्या विळख्यात अडकल्याचं पाहायला मिळालं. अशाच प्रकारची धक्कादायक घटना टिळक रस्ता परिसरात घडली आहे. याप्रकरणी सराइतासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. (Pune Crime News)
मैत्रिणीला मॉडेलिंगसाठी नेल्याने सराइताने एका तरुणावर कोयत्याने वार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी ओम गायकवाड, त्याचे साथीदार आनंद, रोहन, सुमीत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेदांत राजकुमार शिंदे असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. गायकवाड सराइत आहे. गायकवाडच्या मैत्रिणीला वेदांतने मॉडेलिंगसाठी नेले होते. त्यामुळे गायकवाड वेदांतवर चिडला होता.
मंगळवारी सायंकाळी आरोपी गायकवाड आणि त्याच्या साथीदारांनी वेदांतला टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालय परिसरात गाठले. त्याच्यावर कोयत्याने वार केले. त्याला जीवे मारण्याची धमकी देऊन चौघे जण पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपाली भुजबळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग वाघमारे तपास करत आहेत.