ताज्या बातम्यापुणेमहाराष्ट्रसिटी अपडेट्स

पुणेकरांनी जपली सामाजिक बांधिलकी

‘साडी चॅलेंज’ उपक्रमाला राज्यभरातून प्रतिसाद; 16 हजार साड्या, ब्लॅंकेट व धान्य साहित्याचे संकलन

पुणे | Pune News – पूरग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस व दारवा तालुक्यातील बंधू-भगिनींसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून पुणेकरांनी सामाजिक बांधिलकी जपत संकलित केलेल्या तीन ट्रक कपडे, खाद्य व धान्य साहित्याची मदत गुरुवारी यावंतांलाकडे रवाना करण्यात आली. जवळपास १६ हजार साड्या, हजारो ब्लँकेट्स, चादरी यासह बिस्किट्स, शिधा आदी साहित्याचा समावेश आहे.

वंदे मातरम संघटनेच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या ‘साडी चॅलेंज’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सोशल मीडियावर ‘साडी चॅलेंज’ इतके व्हायरल झाले की, राज्याच्या विविध भागातून साड्या आणि कपड्यांचा ओघ सुरु झाला. अवघ्या दोनच दिवसात १६ हजारांपेक्षा अधिक साड्या, ब्लॅंकेट व चादरी संकलित झाले. पुण्यासह ठाणे, मुंबई, चिपळूण, नागपूर, वर्धा, लातूर, अकोला, बीड, नंदुरबार, शहादा, सुरत आदी ठिकाणाहून हे साहित्य संकलित झाले आहे.

यवतमाळ पूरग्रस्त सहकार्य अभियानात वंदे मातरम संघटना, युवा फिनिक्स सोसायटी, युवा वाद्य पथक, गुजर महिला विकास मंच, व्हीएसजीजीएम, रुद्रांग वाद्य पथक, केदारेश्वर प्रतिष्ठान, रोटरी क्लब, टीम सुभेदार, दि पुणे मर्चंट चेंबर, डीमार्फ, युवा स्पंदन, चांगुलपणाची चळवळ, स्वरूपवर्धिनी या संस्थांसह स्वयंसेवी ४०० ते ५०० कार्यकर्ते यामध्ये काम करत आहेत.

वंदे मातरम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वैभव वाघ म्हणाले, “गेल्या आठवड्यात यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस आणि दारवा या तालुक्यांना पुराचा मोठा फटका बसला. अनेक गावांतील बंधू-भगिनींना रोजचे घालण्याचे कपडे, खाण्याचे साहित्य खराब झाले. ही बाब लक्षात घेऊन आम्ही ‘साडी चॅलेंज’ हा उपक्रम सोशल मीडियावर राबवत मदत करण्याची साद घातली. राज्यभरातील माताभगिनींनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत खऱ्या अर्थाने ‘बाई पण भारी देवा’ असल्याचे सिद्ध केले. या दोन दिवसांत माणुसकी आणि चांगुलपणाची भावना अनुभवायला मिळाली.”

सचिन जामगे म्हणाले, “कपडे, खाद्य साहित्य याचे व्यवस्थित पॅकिंग करण्यात आले असून, पूरग्रस्त भागातील गरजूंना नियोजनपूर्वक वितरित करण्यासाठी कार्यकर्ते अहोरात्र झटत आहेत. पुण्यातून हे तीन ट्रक पाठविण्यात येत असून, तिथे दोन्ही तालुक्यातील पूरग्रस्तांना स्थानिक प्रशासन व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने ही मदत पुरविण्यात येणार आहे.”

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये