ताज्या बातम्या

चित्रा वाघ यांनी माफी मागावी अन्यथा… पॉर्नस्टार असल्याचा आरोप केलेल्या अभिनेत्याने दिला इशारा

मुंबई | गुरुवारी चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना ठाकरे गटाच्या निवडणूक जाहिरातीवर आक्षेप घेतला. या जाहिरातीमधील कलाकार हा पॉर्न स्टार असल्याचा आरोप त्यांनी केला होता. मात्र आरोप केल्याप्रकरणी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ अडचणीत येण्याची शक्यता आहे.

चित्रा वाघ यांनी आरोप केलेल्या अभिनेत्याने चित्रा वाघ यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. वाघ यांनी माफी न मागितल्यास आपण कोर्टात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा अभिनेते प्याराली उर्फ राज नयानी यांनी दिला आहे.

अभिनेते प्याराली उर्फ राज नयानी यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटले की, मी एक चारित्र्यवान कलावंत आहे आणि एका कलावंताचा अपमान केला म्हणून भाजपा नेता चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी अन्यथा मी त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार आहे.

भाजपच्या नेत्या चित्रा वाघ या एक सुशिक्षित महिला आहेत. कलावंत जेव्हा एखाद्या सिनेमांत किंवा मालिकेत काम करतो तेव्हा त्याला त्या भूमिकेची जशी मागणी असते त्याप्रमाणे अभिनय करावा लागतो हे त्यांना माहीत असावे असेही त्यांनी म्हटले.

चित्रा वाघ यांनी माझा अपमान केला…

राज नयानी यांनी म्हटले की, चित्रा वाघ यांनी माझ्या एका वेब सीरीजमधील भूमिकेतील फोटो दाखवून मी पॉर्न स्टार असल्याचा दावा केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जाहिरातीत मी काम केले आहे. त्यामुळे त्या जाहिराती करणारा कलावंत पॉर्न स्टार असल्याचा शोध त्यांनी लावला. जे फोटो त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दाखवले ते माझ्या एका वेब सीरिज मधले आहेत आणि ते त्या भूमिकेचा एक भाग होते असेही त्यांनी स्पष्ट केले. चित्रा वाघ यांनी विनाकारण माझ्या प्रतिमेला मलीन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मला मनस्ताप सहन करावा लागला आहे. केवळ आपल्या राजकीय स्वार्थासाठी त्यांनी माझी प्रतिमा मलीन केली असल्याचेही त्यांनी म्हटले.

माझा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही!

‘मी कुठल्याही राजकीय पक्षाचा किंवा राजकीय नेत्याचा पाठीराखा नाही. मला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. मी एक भारतीय आहे. माझ्यासाठी देश सर्वात आधी आणि सर्व देशवासीय माझ्यासाठी सारखेच आहेत,’ असंही प्याराली नयानी यांनी स्पष्ट केलं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये