
राहुल गांधी यांची पदयात्रा दि.२० नंतर महाराष्ट्राबाहेर पुढील प्रवासासाठी रवाना होणार आहे. मात्र, दि. ७ पासून अत्यंत गुळमुळीत सुरु असलेल्या या यात्रेला गांधी यांनी जाताजाता स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विषय काढून अतिशय ठामपणे चालणारी ही यात्रा चाऊन चोथा झालेल्या विषयावरून राजकारणाच्या निसरड्या वाटेवर नेली आणि पदयात्रा अखेरच्या टप्प्यात घसरली.
राहुल गांधींची राज्यातील भारत जोडो यात्रा अगदीच शेवटच्या टप्प्यात आली आहे. यात्रेने नांदेडमध्ये आल्यापासून ते आता अकोला येथे येईपर्यंत कोणताच सनसनाटी विषय चर्चेला दिला नव्हता. अगदीच गुळमाट यात्रा होत आली होती. ना राहुल गांधी यांना फुटेज मिळत होते, ना यात्रेला म्हणावी तशी पकड. मिळमिळीत मचुळ बातम्या केवळ येत होत्या. दररोज राहुल गांधी यांना भेटल्यावर धाय मोकलून रडण्याऱ्या भगिनी, लहान मुलांमध्ये गप्पा, कुस्तीच्या फडात चक्कर, कोणाला संगणक भेट या पलिकडे बातम्यांना वाव नव्हता. एकूणच पदयात्रा आली कधी आणि गेली कधी हे कळत नव्हते. मात्र, अखेरीस राहुल गांधी यांच्या मार्गदर्शकांनी, सल्लागारांनी स्वातंत्र्यवीर सावरकर नावाचं ब्रह्मास्त्र बाहेर काढण्याच्या सल्ला दिला आणि आज अचानक अनेकांना राहुल गांधी यांची पदयात्रा सुरू झाल्याचा साक्षात्कार झाला आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चक्क राहुल गांधी आणि शिवसेनेवर टीका केली.राहुल गांधी यांना सल्लागारांनी लिहून दिलेली भाषणे वाचण्यापेक्षा अधिक काही नाही हे सांगताना, शिवसेनेला वीर सावरकरांबद्दल प्रेम आहे की नाही, बाळासाहेबांच्या सावरकर प्रेमाची चाड आहे की नाही, अशा अशायचा प्रश्न केला आहे. शिवसेनेला पुन्हा एकदा कोपऱ्यात गाठण्याचा हा प्रयत्न भाजप करत आहे.आपण वारंवार राष्ट्रसंचारच्या अग्रलेखात भारतीय जनता पक्ष प्रादेशिक पक्षांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहे, हे सांगत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना जेरीस आणणे हे त्यांचे ध्येय आहे. आणि फडणवीस यांच्या उद्गारातून हेच सिद्ध होत आहे. मात्र, मूळ मुद्दा राहुल गांधी यांच्या यात्रेच्या विचारधारेतून घसरण्याचा आहे.आत्तापर्यंत पंतप्रधान मोदींवर राहुल गांधी बोलत होते. त्यांची धोरणे कशी चुकीची आहेत. त्यांच्या धोरणामुळे महागाई वाढत आहे. बेरोजगारांचे जथ्थेच्या जथ्थे निर्माण होत आहेत. तसेच शिक्षण, आरोग्य, पाणी, रस्ते या विषयांवर राहुल गांधी थेटपणे विचार मांडत होते. ते सर्वसामान्य जनतेला पटत, रुचत होते. केवळ प्रतििक्रयात्मक राजकारण आणि वादविवादांना जनता खरोखरच कंटाळली आहे. राहुल गांधी त्यांना मुलगा किंवा भावासारखा वाटतो. कारण त्यांनी तोपर्यंत राजकीय, विवादास्पद काही विषय घेतले नव्हते. रोजच्या जीवन मरणाच्या मुद्द्यांकडे ते सर्वसामान्यांच्या नजरेनी पहात होते. सर्वसामान्यांच्या भाषेत बोलत होते. मात्र अब्दुल सत्तार-सुप्रिया सुळे, संजय राऊत, जितेंद्र आव्हाड यांनी पदयात्रेचे फुटेज खायला सुरवात केली आणि अखेरीस राहुल गांधीही राजकारणाच्या आणि वादावादीच्या निसरड्या वाटेवरून पदयात्रा नेताना जोरदार घसरलेच. आता दोन दिवस पदयात्रेचा धुरळा उडेल. राष्ट्रवादी, शिवसेनेचे सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे आणि त्यांना मानणारे अनेकजण या यात्रेच्या पहिल्या दुसऱ्या दिवशी स्वागतास गेले होते. गळाभेट घेते झाले होते. मात्र, त्याचा फारसा परिणाम माध्यमांमध्ये दिसला नाही. माध्यमांबाबत असलेले चिंतातूर जंतू या प्रकाराने अस्वस्थ झाले. पदयात्रेत गाणे वापरले म्हणून कॉपीराईटचा गुन्हा दाखल करणे जेवढे गाजले तेवढे या नेत्यांच्या भेटी गाजल्या नाहीत. तेव्हा खरोखर अत्यंत गांभीर्याने, मुद्दे घेऊन, सर्वसामान्यांना आपलीशी वाटणारी ही पदयात्रा आपला तोल अखेरच्या काही दिवसात घालवून बसली. सावरकरांचा मुद्दा काढायचा. प्रत्युत्तर न घेता पळ काढायचा, हा पण नियाेजनाचा भाग असू शकतो. मात्र, घसरायचे किती, हे ज्याचे त्याने ठरवायचे नाही का ?