ताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाऊस पडतो बाहेर, तेव्हा होऊन जाऊ द्या गरम भजी!

भजी हा चटपटीत खाणाऱ्यांसाठीचा आवडता पदार्थ

हिरव्या मेथीची भजी
हिरवी मेथी किंवा मेथीच्या पानांचा सुंगध सर्वांनाच आपल्याकडे आकर्षित करतो. बेसनाच्या पिठात घोळून तळलेले मेथीची भजी आणि गरमागरम वाफाळलेला चहा थंडीत काही औरच मजा देऊन जातो. मेथीमध्ये गुणधर्म दडलेले असतात जे हिवाळ्यात थंड पडणाऱ्या शरीराला ऊब प्रदान करतात व आतून उष्ण ठेवतात.

पालकाची भजी
मन तृप्त करणाऱ्या पदार्थांपैकी एक असतात पालक. एकदम बारीक चिरलेल्या हिरव्या मिरचीसोबत तयार केली जाणारी चटपटीत पालकाची भजी दुपारच्या जेवणात किंवा स्नॅक्समध्ये खाल्ली जाते. हिरवी मिरची आणि पालक दोन्हीही घटक शरीरासाठी अत्यंत पोषक व लाभदायक असतात. पालक रक्त शुद्धीकरणास व हिमोग्लोबिनची पातळी व्यवस्थित ठेवण्यास मदत करतो.

अळूच्या पानांची भजी
अळूच्या पानांची भजी बनवण्याची पाककृती जरा इतर प्रकारच्या भज्यांच्या तुलनेत वेगळी असते. बाकी सर्व प्रकारातील भजी बनवण्यासाठी त्या भाजीची पाने बेसनमध्ये घोळवून तेलात तळली जातात. पण अळूच्या पानांची भजी बनवण्यासाठी बेसन पिठात मीठ, तेल, लाल तिखट, मसाला मिसळून ते पानांच्या मध्ये घातलं जातं. पानांची सुरळी करुन त्याला वरून धागा बांधला जातो आणि ते तेलात तळले जातात.

फ्लॉवर भजी
बटाटा-फ्लाॅवरच्या भाजीविना जणू काही थंडीची मजाच अपूर्ण राहाते. तसंच फ्लाॅवरची भजीदेखील थंडीच्या महिन्यात अगदी चवीने खाल्ली जातात. फ्लॉवर पचनास अतिशय हलका असतात. फ्लॉवरची भजी चवीस आणि आरोग्याला दोन्हीसाठी उत्तम असतात.

कांदा भजी
कांदा भजी माहीत नाही किंवा खाल्ली नाहीत असा माणूस शोधून कुठे सापडणार नाही. सर्वांना सर्रास कांदा भजी आवडतात. शिवाय कांदा भजी ही झटपट बनतात व कमी वेळात जिभेचे चोचले पुरवणारा एक उत्तम पर्याय मानले जातात. ऋतू कोणताही असो हिवाळा, पावसाळा किंवा मग उन्हाळा, निवांत क्षण अजून सुंदर बनवण्यासाठी कांदा भजीचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता. कांदा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करतो. तसंच कांदा भजी पचनक्रिया सुरळीत बनवून सर्दी-पडसे, ताप अशा आजारांना शरीरापासून दूर ठेवतात.

मुगाच्या डाळीची भजी
मुगाची डाळ आरोग्यदायी आणि लाभदायी असते. काही तास भिजवून ठेवलेली मूग डाळ वाटून त्याची बारीक पेस्ट केली जाते. या पेस्टमध्ये मीठ, लाल तिखट, मसाले मिसळून त्याची भजी बनवले जातात. रोज रोजचा नाश्ता खाऊन किंवा गोड खाऊन खाऊन कंटाळला असाल तर मूग डाळीची पौष्टिक भजी, हा एक मस्त पर्याय ठरू शकतो. ही भजी हिरवी चटणी, सॉस किंवा चहासोबत चविष्ट लागतात.

बटाटा भजी
कच्च्या बटाट्याचे बारीक स्लाईस करून ते मीठ आणि तिखट असलेल्या बेसनच्या पिठात टाकून तेलात सोडले जाते. बेसनचा थर बटाट्याच्या स्लाइसला चिकटून एक सुंदर भजी तयार होते. अनेकांना बटाटावडा आवडत नाही, पण बटाटा भजी मात्र ते चवीने खातात.

मिरचीची भजी
साधारण वीतभर लांब आकाराच्या असलेल्या मिरचीची भजी तयार केली जाते. मीठ आणि तिखट घातलेल्या बेसनच्या पिठात ती मिसळून तेलात सोडली जाते. पण ती अगोदर मधून उभी चिरली जाते. या मिरच्या चवीला जास्त तिखट नसतात. त्यांची भजी देखील खुमासदार लागतात.

कारल्याची भजी
कारले हे अनेकांना आवडत नाही. कारल्याची भाजी म्हटली की अनेकांच्या कपाळाला आठ्या पडतात. पण कारल्याची गुणकारी किमया अनेकांना ठाऊक नाही. त्यामुळे कारल्याची भाजी खाण्याचा कंटाळा करणाऱ्यांसाठी कारल्याची भजी हा उत्तम पर्याय आहे. कारले बटाट्याच्या भजीसारखे स्लाईसमध्ये कापून घेतले जाते. त्याच्या मधील बिया धुवून घेतल्या जातात आणि इतर प्रक्रियांप्रमाणे ते बेसनाच्या पिठात मिसळून तेलात सोडले जाते. या भजी तुलनेने कमी कडू लागतात आणि त्यामुळे कारले पोटात देखील जाते.

इतर प्रकार
याशिवाय गृहिणींना दोडक्याची भजी, भेंडीची भजी, चवळीच्या पानांची भजी, पडवळाची भजी, वांग्याची भजी, सुरणाची भजी, मक्याच्या दाण्यांची भजी, कोथंबीर भजी, पोह्याची भजी बनवता येतात.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये