‘आजच मोर्चा का? सेटलमेन्टसाठी?’ राज ठाकरेंचा मविआ नेत्यांवर घणाघाती आरोप
मुंबई : (Raj Thackeray On Uddhav Thackeray) धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी ग्रुपकडे गेल्यानंतर महाविकास आघाडीकडून त्याविरोधात आंदोलन केलं जात आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली याविरोधात मोर्चा देखील काढण्यात आला होता. या सर्व प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तिथे नेमकं काय होणार आहे हा प्रश्न विचारला का? की मोर्चाने दबाव आणून फक्त सेटलमेंट करायची आहे? असा थेट सवाल राज ठाकरेंनी विचारला आहे.
एक मोठा प्रकल्प मुंबईत येतोय, तो परस्पर अदानींना का दिला? इथंपासून सुरूवात होते. अदानींकडे असं काय आहे की, ज्यामुळे विमानतळ, कोळसा तेच हताळू शकतात? अनेक कंपन्या आहेत ज्यांच्याकडून तुम्ही टेंडर, डिझाईन मागवून घ्यायला पाहिजे होतं. विषय एवढाच आहे की, महाविकास आघाडीला आज का जाग आली? जाहीर होऊन १० महिने झाले, मग आज का मोर्चा काढला? की सेटलमेंट नीट होत नाही म्हणून? असा खोचक सवाल देखील राज ठाकरे यांनी यावेळी विचारला
प्रकल्पाला तुमचं समर्थन आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा राज ठाकरे म्हणाले की बीडीडी चाळीच्या वेळी देखील मी तेथे गेलो होतो. तिथे एक ओपन स्पेस लागते, तिथं किती शाळा, कॉलेज, रस्ते होणार आहेत याचं डाऊन प्लॅनिंग लागत, असं मी सांगितलं होतं. आठ-दहा महिन्यानंतर जागे झालेल्या महाविकास आघाडीने तिथे नेमकं काय होणार आहे हा प्रश्न विचारला का? की मोर्चाने दबाव आणून फक्त सेटलमेंट करायची आहे? हे एकदा त्याच लोकांना विचारलं पाहिजे, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.