“हा पोट्टा वरवंटा फिरवणार…”, राज ठाकरेंचा आक्रमक इशारा

मुंबई | Raj Thackeray – मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आज (23 डिसेंबर) नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते पक्षातील पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं. यादरम्यान बोलताना राज ठाकरेंनी मनसेची (MNS) खिल्ली उडवणाऱ्यांवर निशाणा साधला. आज आमच्या शाखाध्यक्षांना बघून लोकं म्हणतील हे पोट्टं काय करणार? मात्र, काही दिवसांनी हेच पोट्टं तुमच्यावर वरवंटा फिरवेल, असा इशारा राज ठाकरेंनी दिला.
“गेल्यावेळी मी दौऱ्यावर आलो होतो तेव्हा मनसेला पदाधिकारी मिळत नाही, अशा बातम्या आल्या होत्या. त्यांच्या डोळ्यात अंजन घालावं यासाठी पदाधिकाऱ्यांना आज पत्रवाटप करण्यात आलं आहे. तसंच काही पत्रकार एखाद्या पक्षासाठी वाहलेले असतात. काही जणांनी इतके वर्ष पक्षांची दलाली केली असेल तर त्यांना दुसरा पक्ष वाढत असताना त्रास होणारच. मात्र, मनसेला नागपूरमधील काही पत्रकार प्रोत्साहन देत आहेत”, असं राज ठाकरे म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, “एखाद्या पक्षाचा विजय आणि पराभव होत राहतो. आधी विदर्भ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. त्यानंतर तो भाजपचा झाला. त्यामुळे यातून प्रत्येक राजकीय पक्ष गेला आहे. आज आमच्या शाखाध्यक्षांना बघून लोकं म्हणतील ‘हे पोट्टं काय करणार? मात्र, काही दिवसांनी हे पोट्टं तुमच्यावर वरवंटा फिरवेल”, असा इशारा राज ठाकरेंनी दिला.
“पक्ष उभारणीसाठी जीवाचं रान करावं लागतं. काँग्रेसच्या लोकांनी खूप संघर्ष केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी देखील अनेक वर्ष संघर्ष केला. शिवसेना 1966 ला स्थापन झाली मात्र सत्ता 1995 ला आली. आजचं राजकारण पाहता प्रत्येकाला असं वाटतं की, सर्वांना सर्व गोष्टी लवकर हव्या आहेत. सर्व पटकन झालं पाहिजे. मात्र त्यासाठी जीवाचं रान करावं लागतं. आपल्याही जीवनात विजय झाले तर कधी पराभव झाले, मात्र आम्ही कधी खचलो नाही आणि खचणारही नाही. माझा ज्या कुटुंबात जन्म झाला तिथे असे संस्कारच नाहीत. ज्यांना आज नियुक्ती मिळाली आहे, त्यांच्यात काम करण्याची आग असली पाहिजे. पराभव होतील मात्र खचून जाऊ नका. विरोधक तुमच्यावर हसतील, हे काय करत आहेत, असं म्हणतील. फक्त पाय जमिनीत रोवून उभे रहा, विजय आपलाच आहे”, असा कानमंत्रही राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिला.