“हा धरसोड करण्याचा प्रकार…”, 2 हजारांच्या नोटा वितरणातून काढल्यानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

नाशिक | Raj Thackeray – काल (19 मे) भारतीय रिझर्व्ह बॅकेनं दोन हजार रूपयांची नोट वितरणातून काढली. त्यानंतर यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. यामध्ये आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा धरसोड करण्याचा प्रकार आहे, तज्ज्ञांना विचारून या गोष्टी केल्या असत्या तर ही वेळ आली नसती, असं म्हणत राज ठाकरेंनी मोदी सरकारवर टीका केली आहे. ते आज (20 मे) नाशिक दौऱ्यावर असून यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
यावेळी राज ठाकरे म्हणाले, “नोटबंदी झाली त्यावेळी मी एक भाषण केलं होतं. हा धरसोड करण्याचा प्रकार असून तज्ज्ञांना विचारून या गोष्टी झाल्या असत्या तर आज ही वेळ आली नसती. एखादी गोष्ट कधीही आणायची, ती कधीही बंद करायची. त्यावेळीही नोटा आणल्या आणि नंतर काय झालं त्या नोटा एटीएममध्येही जात नव्हत्या. याचा अर्थ नोटा आणताना त्या मशीमध्ये जातात की नाही हे देखील तपासलं नव्हतं.”
“हे असे निर्णय देशाला परवडणारे नाहीत. आता लोकांनी पुन्हा बँकेत पैसे टाकायचे. मग हे पुन्हा नव्या नोटा आणणार. हे असं केल्यानं सरकार चालत नाही”, असंही राज ठाकरे म्हणाले.