वेदांता-फाॅक्सकाॅन प्रकल्पावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “हा प्रकल्प…”

नागपूर | Raj Thackeray’s Reaction On Vedanta-Foxconn Project – वेदांता-फाॅक्सकाॅन (Vedanta-Foxconn) प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने राज्यामध्ये राजकारण चांगलंच तापलं आहे. या प्रकल्पावरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं जातंय. याच संदर्भात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्योग क्षेत्राकडे महाराष्ट्राचं लक्ष नाहीये. हा प्रकल्प गुजरातला का गेला? या उद्योजकांना कोणी पैसे मागितले होते का? असे प्रश्न उपस्थित करत याबाबतची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. ते आज (19 सप्टेंबर) नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी राज ठाकरे म्हणाले, “औद्योगिक क्षेत्राकडे महाराष्ट्राचं लक्ष नाहीये. नेमकं कोठे बिघडलं याची चौकशी होणं गरजेचं आहे. या उद्योजकांकडे पैसे मागितले गेले का? प्रत्येक राज्यात उद्योगधंदे यायलाच पाहिजेत. पण महाराष्ट्रात आलेले उद्योग राज्याबाहेर का जात आहेत, याची चौकशी होणं गरजेचं आहे”.
येणाऱ्या उद्योगांवर आपलं लक्ष नसेल तर आपल्याकडे कोण आणि का येईल? उद्योगातून रोजगार निर्मिती किती होतेय, हे पाहणं गरजेचं आहे. आपण महाराष्ट्रातून उद्योग घालवतोय यापेक्षा दुसरं दुर्दैवी काहीही नाही. गुजरातकडून चांगली सुविधा दिली जात असेल, तर फॉक्सकॉनचा कारखाना तिकडे का जाणार नाही? असा सवालही राज ठाकरेंनी केला आहे.