सिटी अपडेट्स

‘कृषिरत्न’ स्वीकारण्यास राजेंद्र पवार यांचा नकार

राज्यपालांच्या हस्ते झाले वितरण

बारामती : ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांचे पुतणे आणि डॉ. आप्पासाहेब पवार यांचे पुत्र राजेंद्र पवार यांनी त्यांना जाहीर झालेला राज्य शासनाचा पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते स्वीकारण्यास नकार दिला आहे. बारामती अ‍ॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन असलेले राजेंद्र पवार या सोहळ्यास अनुपस्थित राहणार आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सोमवारी नाशिकमध्ये या पुरस्कारांचे वितरण झाले.

बारामतीच्या अ‍ॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष शरद पवार हे आहेत. त्यांचे पुतणे, पद्मश्री डॉ. आप्पाासाहेब पवार यांचे सुपुत्र राजेंद्र पवार हे चेअरमन आहेत. त्यांनी आजवर शेती क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पवार यांनी आनंद व्यक्त केला होता. परंतु ज्यांच्या हस्ते वितरण होत आहे हे समजताच त्यांनी सोहळ्याला जाणे टाळले.

यासंबंधी राजेंद्र पवार म्हणाले, या सोहळ्याला न जाण्यामागे अनेक कारणे आहेत. हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे. शेतकर्‍यांच्या भाजीच्या देठालाही हात लागणार नाही, याची काळजी या महान राजाने घेतली. त्यांचा आदर्श आपल्यापुढे आहे. ज्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातोय त्या पंजाबराव देशमुख यांनी कृषी धोरणात बदलासाठी मोठे योगदान दिले. शेतीच्या बाबतीत राज्य समृद्ध केले. मी आजवर शेती आणि शिक्षण क्षेत्रात काम केले.

शिक्षण क्षेत्रात आपण महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांचे योगदान जाणतो, परंतु दुर्दैवाने गेल्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्राचा इतिहास माहीत नसणारे लोक अराजकता निर्माण करीत आहेत. त्याला खतपाणी घालणार्‍यांच्या हस्ते मी हा पुरस्कार कसा स्वीकारावा?

Related Articles

Leave a Reply

Check Also
Close
Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये