राष्ट्रसंचार कनेक्ट

राजगुरुनगर रस्ता राष्ट्रीय महामार्ग घोषित

खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश

ओतुर : शिरूर लोकसभा मतदारसंघातील भक्ती आणि शक्तीस्थळे जोडणारा बनकर फाटा ते घोडेगावमार्गे, तळेघर आणि भीमाशंकर ते वाडामार्गे राजगुरुनगर १३८ किमी लांबीचा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्याची मागणी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी मान्य केली, याबद्दल खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांचे आभार मानले आहेत. राष्ट्रीय महामार्ग घोषित झाल्याने या रस्त्याच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला असून या निर्णयामुळे येथील पर्यटनाला चालना मिळणार असल्याची प्रतिक्रिया खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघात भक्ती-शक्ती कॉरिडॉर ही संकल्पना मांडल्यानंतर या संकल्पनेचाच एक भाग म्हणून १२ ऑक्टोबर २०२१ रोजी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठवले होते. तसेच प्रत्यक्ष भेटीत या रस्त्यामुळे ऐतिहासिक व धार्मिक स्थळे जोडली जाणार असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणले होते. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीयमंत्री गडकरी यांनी १६ मार्च २०२२ रोजी या पायाभूत सुविधा प्रकल्पाचे महत्त्व समजले असून वाहतुकीची घनता, मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीची कार्यक्षमता इष्टतम करणे, प्रदेशाचा सामाजिक-आर्थिक विकास वाढवणे, विद्यमान महामार्गांना जोडणारे रस्ते, पर्यटन विकासासाठी महत्त्वाचे रस्ते, क्षेत्र/प्रदेशाच्या विकासासाठी रस्ते, इत्यादी घटकांचा विचार करून मंत्रालयाच्या राष्ट्रीय महामार्ग बांधकाम कार्यक्रमांमध्ये प्राधान्य आणि समावेशासाठी मूल्यमापन केले जाईल, असे कळवले होते. त्यानुसार बनकर फाटा ते घोडेगावमार्गे तळेघर आणि भीमाशंकर ते वाडा मार्गे राजगुरुनगर १३८ किमी लांबीचा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव विचाराधीन होता.

छत्रपती शिवाजीमहाराजांचे जन्मस्थान असलेला ऐतिहासिक किल्ले शिवनेरी, लेण्याद्री व ओझर हे अष्टविनायक, बौद्धकालीन लेणीसमूह बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्रीक्षेत्र भीमाशंकर ही धार्मिक स्थळे चाकणची औद्योगिक नगरी आदींना जोडणारा हा भक्ती-शक्ती कॉरिडॉर असलेला महत्त्वाकांक्षी रस्ता पूर्ण झाल्यानंतर खेड, आंबेगाव व जुन्नर या तालुक्यांच्या आदिवासी भागाचा कायापालट होणार असून पर्यटनाचे मोठे केंद्र विकसित होणार आहे. या रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्याच्या निर्णयाबद्दल केंद्रीयमंत्री गडकरी यांचे आभार व्यक्त करताना खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, काही वर्षांपूर्वी या रस्त्यासाठी निधी मंजूर झाल्याच्या घोषणा झाल्या. मात्र प्रत्यक्षात हा रस्ता होऊ शकला नाही, ही वस्तुस्थिती आहे. केवळ घोषणा करून उपयोग होत नाही, तर त्यासाठी प्रत्येक स्तरावर पाठपुरावा करावा लागतो आणि त्याच उद्देशाने आधी या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळणे आवश्यक होते, ही बाब लक्षात घेऊन त्यानुसार पाठपुरावा केला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये