राजस्थानमध्ये धक्कातंत्राचा वापर! वसुंधराराजेंचा पत्ता कट? नव्या चेहऱ्याला संधी..
नवी दिल्ली : (Rajsthan News CM) मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदासाठीच्या नावांची घोषणा झाली आहे. राजस्थानमधील मुख्यमंत्रीपदाबाबत सस्पेन्स अद्याप कामय आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपने ज्याप्रकारने नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. त्याप्रमाणे राजस्थानमध्येही मुख्यमंत्रीपदाचा नवा चेहरा असेल असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे भाजप नेत्या वसुंधराराजे यांना धक्का बसण्याची शक्यता आहे.
राजस्थानमध्ये मुख्यमंत्री कोण? याच्या निवडीसाठी मंगळवारी पक्षाची बैठक होणार आहे. त्यामुळे उद्या याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. पण, वसुंधराराजे यांची धाकधुक नक्कीच वाढणार आहे. कारण, छत्तीसगडमध्ये भाजपने आदिवासी नेते विष्णुदेव साय यांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली आहे. तर मध्य प्रदेशमध्ये भाजपने धक्कातंत्राचा वापर केला. चौहान सरकारमध्ये शिक्षणमंत्री राहिलेले मोहन यादव यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे.
राजस्थानमध्येही नवा चेहरा
राजस्थानमध्येही अशाच प्रकारचा प्रयोग होण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये आठ दिवसानंतरही मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स कायम आहे. भाजपने राजस्थानमध्ये निवडणूक प्रचारावेळी किंवा नंतर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केला नव्हता. आता दोन राज्यातील निर्णयामुळे असाच निर्णय राजस्थानमध्ये होण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान, वसुंधराराजे मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही असल्याचं बोललं जातं. शिवाय काही आमदार त्यांच्या बाजूने असल्याने भाजपला सावध पाऊलं उचलावं लागणार आहे. राजस्थानमधील निर्णय उशीराने ठेवून भाजपने वसुंधराराजे यांना संदेश दिल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे मंगळवारी मुख्यमंत्रीपदासाठी कोणाला संधी दिली जाते हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.