आज गारपीट झाली, अवकाळी झाला, फळबागा, धान्य-भाजीपाला सगळं गेलं, राजू शेट्टींनी मांडल्या शेतकऱ्यांच्या वेदना
कोल्हापूर : (Raju Shetty On Shinde-Fadnavis Government) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्यातील कर्मचाऱ्यांच्या संपावर भाष्य केलं आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात होत असलेल्या अवकाळी पावसाचा दाखला देत त्यामुळं होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानाचे पंचनामे करण्यात यावेत यासाठी संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी भूमिका बदलण्याचं आवाहन राजू शेट्टी यांनी केलं होतं. राजू शेट्टींनी एक कविता पोस्ट करत संपकरी कर्मचारी आणि राज्य सरकारला प्रश्न विचारले.
राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतमालाच्या दरवाढीसाठी केलेल्या आंदोलनांचा त्या कवितेच्या माध्यमातून दिला आहे. कांदा दराचं आंदोलन शेतकऱ्यांनी केलं, त्यावेळी कवडीमोल भावानं तो विकावा लागला पण तुमच्या भाज्या बेचव होऊ दिल्या नाहीत, असं राजू शेट्टी म्हणाले. ऊस दर आंदोलनाच्या काळात कारखाने बंद केले होते पण चहातला गोडवा कमी होऊ दिला नाही, असं राजू शेट्टी म्हणाले.
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी विविध ठिकाणी सरकारी कार्यलयांना शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला पण महिला कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ दिली नाही, असं राजू शेट्टी म्हणाले. राजू शेट्टी यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये राज्यात सुरु असलेल्या अवकाळी पावसानं, गारपिटीनं शेतीच्या झालेल्या नुकसानाचा दाखला देत कर्मचाऱ्यांना शेतीच्या नुकसानाची आठवण करुन दिली आहे.
अवकाळी पावसाच्या काळात गारपीट झाल्यानं फळबागा गेल्या आहेत, हाता तोंडाशी आलेली पीक गेली आहेत. त्यामुळं सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळं पंचनामे रखडले आहेत. शेतकऱ्यांच्या स्थितीकडे पाहता संपकरी कर्मचाऱ्यांनी त्याचा निर्णय घ्यावा, असं आवाहन राजू शेट्टी यांनी केलं होतं.