“मृत्यूनंतर तिनं आत्मा म्हणून परतावं अन्…”, राम गोपाल वर्मा यांचं ट्विट चर्चेत

मुंबई | Shraddha Walkar Case – सध्या श्रद्धा वालकर खून प्रकरणानं (Shraddha Walkar Case) देशात खळबळ उडाली आहे. श्रद्धाचा प्रियकर आफताब पूनावालानं तिची हत्या करून मृतदेहाचे 35 तुकडे केले. कोणाला संशय येऊ नये म्हणून आफताबनं ते तुकडे घरातील फ्रिजमध्ये ठेवले होते. तसंच ठराविक दिवसांनी तो श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे जंगल्यामध्ये फेकायचा. तब्बल सहा महिन्यांनंतर हे दृष्कृत्य आता उघडकीस आलं आहे. दिल्ली पोलिसांनी आफताबला अटक केली असून या प्रकरणावर तपास सुरू आहे.
या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण देश हादरून गेला आहे. या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होताना दिसत आहेत. तसंच या प्रकरणाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. या प्रकरणावर सामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकजण व्यक्त होत आहे. यामध्ये दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांनी श्रद्धा वालकर खून प्रकरणावर भाष्य केलं आहे.
राम गोपाल वर्मा यांनी ट्विटरवर काही पोस्ट शेअर केल्या आहेत. पहिल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “मृत्यूनंतर शांतपणे विश्रांती घेण्याऐवजी तिनं आत्मा म्हणून परतावं आणि त्याच्या शरीराचे 70 तुकडे करावे.” दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी “कायद्याच्या भीतीनं अशा क्रूर हत्या रोखणं शक्य नाही. अशा नराधमांना बळी पडलेल्यांचे आत्मे जर परत आले आणि त्या आत्मांनी मारेकऱ्यांना मारलं तरच अशा गोष्टी थांबवता येतील. हे सर्व व्हावं यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो”, असं लिहिलं आहे. राम गोपाल वर्मा यांची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत असून त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत.