मुंबई : (Ramdas Athwale On Eknath Shinde) शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीला शह देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोगेंद्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाला सोबत घेण्याचा निर्णय घेतला. एकनाथ शिंदेंच्या याच निर्णयावरुन भाजपचा मित्रपक्ष असलेल्या रिपाईचे प्रमुख रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जोगेंद्र कवाडे यांना सोबत घेताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्याशी चर्चा करायला हवी होती. मी सोबत असताना कवाडे यांना घेण्याची गरज नव्हती, असे रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. त्यामुळे एकाला जवळ केलं तरी दुसरा नाराज झाला अशी स्थिती शिंदेंवर आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांना सोबत घेण्यापूर्वी आमच्याशी चर्चा करणे, अत्यंत आवश्यक होते. महायुतीत कुणाला घ्यायचे आहे, कोणत्या पक्षाला घ्यायचे आहे हा महायुतीचा निर्यण असतो. नवीन येणाऱ्या लोकांचे स्वागत आहे. परंतु, आपल्याला विचारामध्ये न घेता थेट घोषणा करण्यात आली हे योग्य नाही, अशी भावनाही रामदास आठवले यांनी बोलून दाखवली.
वंचित बहुजन आघाडी लवकरच महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी जोगेंद्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षासोबत युती करण्याचा निर्णय घेतला होता. या युतीविषयी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस त्यांची समजूत कशाप्रकारे काढणार, हे पाहावे लागेल.