ताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘रसना’ कंपनीचे संस्थापक अरीज खंबाटा यांचं निधन

मुंबई | Rasana Founder Areez Khambatta Passes Away – ‘रसना’ (Rasana) कंपनीचे संस्थापक अरीज पिरोजशाॅ खंबाटा (Areez Khambatta) यांचं शनिवारी निधन झालं आहे. ते 85 वर्षांचे होते. रसना ग्रुपच्यावतीनं सोमवारी जारी करण्यात आलेल्या निवेदनात यासंदर्भातली माहिती देण्यात आली. “भारतीय उद्योग, व्यापार आणि सामाजिक विकासात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे”, असंही या निवेदनात म्हटलं आहे. तसंच अरीज खंबाटा यांच्या निधनानं संपूर्ण उद्योग आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

अरीज खंबाटा हे बेनेव्होलेंट ट्रस्ट आणि रसना फाउंडेशनचे अध्यक्ष होते. रसना ग्रुपने दिलेल्या माहितीनुसार, खंबाटा यांनी भारतीय उद्योग, व्यवसाय आणि समाजसेवेच्या माध्यमातून सामाजिक विकासात महत्त्वाचं योगदान दिलं आहे. अरीज खंबाटा हे अहमदाबाद पारशी पंचायतीचे माजी अध्यक्षही होते. तसंच पारशी-इराणी झोराष्ट्रीयन समुदायाची संघटना असलेल्या WAPIZ या संघटनेचेही ते अध्यक्ष होते. खंबाटा हे रसना या लोकप्रिय घरगुती शीतपेयासाठी ओळखले जातात. सध्या देशात 18 लाख किरकोळ दुकानांवर रसनाची विक्री होते.

पुढे रसना ग्रुपनं शोक व्यक्त करताना म्हटलं आहे की, खंबाटा यांनी केलेल्या मेहनत आणि प्रयत्नांमुळे देशात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे हजारो नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. फळांवर आधारित उत्पादनं विकसित केल्यामुळं लाखो शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे. देशभरातील शेतकऱ्यांना एक बाजारपेठ उपलब्ध झाली आहे, सोबतच शेतकऱ्यांच्या मेहनतीला योग्य मोबदला मिळाला असल्याचंही कंपनीनं म्हटलं आहे. तसंच रसना कंपनीकडून विविध उत्पादने तयार केली जात असून देशात आणि परदेशात त्याला चांगली मागणी आहे.

दरम्यान, अरीज खंबाटा यांनी 1970 मध्ये ‘रसना’ या घरगुती शीतपेयाची निर्मिती केली होती. हे शीतपेय अल्पावधीतच लोकप्रिय झालं होतं. आज देशभरातील 18 लाख रिटेल दुकानांसह जगभरातील 60 देशांमध्ये रसनाची विक्री केली जाते. तसंच ‘मेड इन इंडिया’ उत्पादन असलेल्या रसना या शीतपेयाला समाजातील सर्वच स्तरातील लोकांकडून भरभरून प्रतिसाद लाभला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये