“त्यांनी मला रात्री…”, रवि किशन यांनी सांगितला कास्टिंग काऊचचा भयानक किस्सा

मुंबई | Ravi Kishann – अभिनेते आणि खासदार रवी किशन (Ravi Kishann) हे भोजपुरी सिनेसृष्टीत चांगलेच लोकप्रिय आहेत. त्यांनी हिंदी आणि तेलुगू चित्रपटांमध्येही काम केलंय. तसंच नुकत्याच एका मुलाखतीत रवी किशन यांनी सिनेसृष्टीतील त्यांच्या प्रवासाबाबत सांगितलं. यावेळी त्यांनी कास्टिंग काऊचचा (Casting Couch) एक भयानक किस्साही सांगितला.
‘तुम्ही कास्टिंग काऊचचा सामना केला आहे का?’ असा प्रश्न रवी किशन यांना एका मुलाखतीत विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले की, “हो, पण तिथून मी पळून आलो. कारण माझ्या वडिलांनी मला शिकवलं होतं की, इमानदारीच्या मार्गानंच ध्येय गाठलं जातं. कोणत्याही शाॅर्टकटचा मला वापर करायचा नव्हता. त्यामुळे आयुष्यात मी कधीच शाॅर्टकटचा वापर करू इच्छित नाही.”
“मी टॅलेंटेड आहे, हे मला माहिती होतं. माझ्यासोबत माझे मित्र देखील स्टार झाले होते. त्यावेळी बाॅलिवूडमध्ये अक्षय कुमार, अजय देवगण आले होते. तेव्हा 90 च्या दशकात सगळेच स्टार झाले होते. त्यामुळे मलाही वाटत होतं की, माझाही दिवस येईल”, असंही रवी किशन यांनी सांगितलं.
पुढे त्यांनी कास्टिंग काऊबाबत सांगितलं. ते म्हणाले की, “मी त्या व्यक्तीचं नाव सांगू शकत नाही. पण ती व्यक्ती आता खूप प्रसिद्ध आहे. तेव्हा मी थोडक्यात वाचलो. त्यांना मी म्हणालो की, मला चित्रपट नकोय. तरीही ते मला म्हणाले रात्री कॉफी प्यायला ये. मग मी त्यांना म्हणालो, लोक दिवसा कॉफी पितात आणि तिथून मी बाहेर आलो, अडकलो नाही.”
दरम्यान, 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तेरे नाम’ या चित्रपटातील भूमिकेमुळे रवी किशन चांगलेच प्रसिद्धीझोतात आले. तसंच त्यांनी बिग बॉस, झलक दिखला जा या कार्यक्रमांमध्ये देखील सहभाग घेतला होता. त्यांनी फिर हेरा फेरी, किक 2, गंगा अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.