फरार झाल्याच्या वादाला राजकीय वळण
ललित पाटील पलायनामागे शिंदे गटातील नेता; आ. धंगेकरांचा खळबळजनक आरोप
पुणे : ससून रुग्णालयामधून गांजा आणि अमली पदार्थांचा व्यापार करून सहीसलामत पळून जाणारा ललित पाटीलच्या पाठीमागे कोणीतरी राजकीय शक्ती कार्यरत आहे. त्याशिवाय इतके मोठे धाडस तो करणार नाही. अशी एक सर्वसाधारण मानसिकता पुणेकरांमध्ये आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी याबाबत थेट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील कार्यकर्त्यांवर अंगुलीनिर्देश करून ललित पाटील याच्या पळून जाण्याच्या पाठीमागे शिंदे गटातील एक आमदार असल्याचे धक्कादायक विधान केले. ससून रुग्णालयामध्ये धक्कादायक खुलाशानंतर पुणेकरांमध्ये अस्वस्थता आहे.
फरारी ड्रग्ज माफिया ललित पाटील याला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी मंत्री दादा भुसे यांचा फोन गेला होता, त्यांचे कॉल रेकॉर्ड चेक करा.
– सुषमा अंधारे, ठाकरे गटाच्या नेत्या
सुषमा अंधारे यांनी माझे नाव घेऊन थेट आरोप केला. त्यामुळे याप्रकरणी जगभरातील कोणत्याही यंत्रणेकडून चौकशी करायची असेल तर करा. मी चौकशीला सामोरे जायला तयार आहे. माझ्यावर चुकीचे आरोप केले आहेत.
– दादा भुसे, मंत्री
सरकारी रुग्णालयांमध्ये असे प्रकार खुलेआम चालतात याचा खरोखरच सर्वांना धक्का बसला आहे. परंतु ललित पाटील याचे पोलिसांच्या समक्ष निघून जाणे, तसेच सीसीटीव्ही कॅमेरामध्ये त्याचे निर्भयतेने वावरणे. हे सगळे प्रकार सर्वसामान्य नागरिकांना अचंबित करणारे आहेत. या गुन्हेगाराच्या पाठीमागे कुणीतरी त्याला संरक्षण देत असल्याची भावना प्रबळ होत चालली आहे.
ससून रुग्णालयातील काही अधिकाऱ्यांच्या पलीकडे जाऊन काही लोकप्रतिनिधी आणि राजकीय मंडळी देखील त्याला पाठीशी घालत असलेली पाहिजेत, अशी एक सर्वसाधारण मानसिकता होत आहे, असे असताना महाविकास आघाडीचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी ससून रुग्णालयामध्ये जाऊन यासंबंधीची पाहणी केली. तसेच प्रशासनाकडे त्यांनी याबाबत तक्रार नोंदवत असताना शिंदे गटातील एक आमदार याला पाठीशी घालत असल्याचा सरळ सरळ आरोप केला. या आरोपामुळे राजकारणातील गुन्हेगारी वृत्तीला पाठीशी घालणारी वृत्ती आणि त्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उघड उघड सहभाग याच्या अनुषंगाने नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
पुणे सारख्या शांत शब्द लोकवस्ती असलेल्या शहरांमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असली तरी त्याचा फार मोठा भडका कधी उडालेला नाही. सार्वजनिक व्यवस्थेत इतकी मोठी गुन्हेगारी उथळ माथ्याने कधी वाढली नव्हती. शिंदे गटाच्या तथाकथित काही आमदार आणि नगरसेवकांमुळे या गुन्हेगारी प्रवृत्ती डोके वर काढत आहेत का, अशा चर्चा आता नागरिकांत होत आहे.
आरोपी ललित पाटील हा अजूनही फरार आहे. याच प्रकरणी सुषमा अंधारे यांनी मंत्री दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या आरोपांवर दादा भुसे यांनी स्पष्टीकरणही दिले. पण असे असताना आता नवे फोटो समोर आले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दादा भुसे यांच्या स्पष्टीकरणानंतर आता ललित पाटील याचे शिवसेना पक्षप्रवेशाचे फोटो समोर आले आहेत. या फोटोत ललित पाटील आणि उद्धव ठाकरे एकत्रितपणे दिसत आहेत. या फोटोत दादा भुसे हे देखील दिसत आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.